सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : शहरात दरदिवशी सुमारे दोन हजारांहून अधिक नव्या करोना रुग्णांची भर पडत असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही आठवडाभरात सुमारे १४ टक्कय़ांनी वाढली आहे. त्यामुळे आता रुग्णालयातील खाटा पुन्हा एकदा भरू लागल्या आहेत. यात बहुतांश रुग्णांना सौम्य ते मध्यम लक्षणे आहेत.

मुंबईत दुसऱ्या लाटेचे स्वरूप सध्या जरी तीव्र नसले तरी संसर्ग प्रसार मात्र झपाटय़ाने होत आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढली आहे. यातील जवळपास ८० टक्के रुग्णांना लक्षणे नसली तरी दरदिवशीच्या दोन हजार रुग्णांमागे २० टक्के रुग्णांना कोणती तरी लक्षणे आहेत. यापैकी काही रुग्ण रुग्णालयात दाखल होत असल्याने रुग्णालयातील रुग्णांची संख्याही त्या तुलनेत वाढत आहे.

आठवडाभरापूर्वी रुग्णालयात ४९८५ रुग्ण दाखल होते. यापैकी ३,८१८ रुग्ण पालिका रुग्णालयात, तर १,१६७ रुग्ण खासगी रुग्णालयात होते. मंगळवारच्या आकडेवारीनुसार दाखल रुग्णांची संख्या ५७६७ पर्यंत वाढली आहे. पालिका रुग्णालयांतील रुग्णांची संख्या जास्त वाढली असून सध्या पालिका रुग्णालयांत ४४०५, तर खासगी रुग्णालयांत १३६२ रुग्ण दाखल आहे.

मागील पाच दिवसांत रुग्णसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असून सध्या ७०० हून अधिक खाटांवर रुग्ण आहेत. १५ दिवसांपूर्वी दरदिवशी सुमारे ४० रुग्ण दाखल होत होते. आता हे प्रमाण जवळपास १०० पर्यत गेले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक असून बहुतांश रुग्ण सातव्या दिवशी बरे होत आहेत, अशी माहिती वांद्रे-कुर्ला संकुलातील करोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली. ‘बुधवारी एका दिवसात ११७ रुग्ण दाखल झाले आहेत. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे, तसे दाखल रुग्णांची संख्याही वाढत आहे. सध्या १२४६ रुग्ण दाखल असून यातील अतिदक्षता विभागात २२३ रुग्ण आहेत. सौम्य ते मध्यम लक्षणे असलेले रुग्ण जास्त आहेत, असे सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांनी सांगितले.

४० टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची आवश्यकता

‘रुग्णालयात रुग्ण लवकर दाखल झाल्यास वेळीच उपचार सुरू होतात. त्यामुळे रुग्णांना फारशी ऑक्सिजनची आवश्यकता भासत नाही. सध्या ४० टक्के रुग्णांना ऑक्सिजन लावावे लागत असून अद्याप हे प्रमाण कमी आहे. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या ही पाच टक्कय़ांहून कमी आहे,’ असे डॉ. राजेश डेरे यांनी सांगितले.

खाटांची स्थिती

खाटा          पालिका रुग्णालय    खासगी रुग्णालये            एकूण

क्षमता            १०,७२९                         २,३३३                       १३,०६२

रिक्त खाटा     ७,२९५                            ९७१                          ६३२४