चाचणी न करताच करोना केंद्रांतून पाठवणी; वस्तीत घेण्यास शेजाऱ्यांचा विरोध

मुंबई : करोनाच्या रुग्णांसंदर्भात केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन धोरण वादग्रस्त ठरत असून याचा रुग्णांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे. एकीकडे ठरावीक कालावधी पूर्ण झाल्यानंतर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांची प्रयोगशाळा चाचणी न करताच घरी रवानगी करण्याचे या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे अशा रुग्णांना त्यांच्या निवासी वस्ती वा वसाहतींत प्रवेश देण्यास त्यांच्या शेजाऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे.

आतापर्यंत करोनाची सौम्य, अतिसौम्य, मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना आरोग्य उपचार केंद्रांमध्ये ठेवण्यात येत आहे. तसेच करोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या, मात्र चाचणीअंती करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झालेल्यांना करोना दक्षता केंद्रात ठेवण्यात येत होते. अशा रुग्णांसाठी अनुक्रमे करोना दक्षता केंद्र आणि करोना दक्षता केंद्र २ अशा दोन प्रकारची व्यवस्था आहे. लक्षणे नसलेल्यांना मात्र करोनाची बाधा झालेल्यांचे घर लहान असलेल्यांना या केंद्रांमध्ये ठेवण्यात येते. सध्या या केंद्रांमध्ये वरळी, धारावीतील नागरिक मोठय़ा संख्येने दाखल आहेत. आता या केंद्रात दाखल रुग्णांना घरी पाठविण्याबाबतच्या धोरणात केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार बदल करण्यात आला आहे. या निर्देशांचा आधार घेऊन राज्य सरकारने याबाबत सुधारित धोरण आखले आहे.

या केंद्रांमध्ये दाखल रुग्णाला ठरावीक दिवस कोणतीच लक्षणे नसतील तर नियोजित दिवसांनी त्याला घरी पाठविण्यात येते. परंतु चाचणीशिवायच घरी पाठविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांकडून समजल्यामुळे ते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. बरेच रुग्ण चाळ, बैठय़ा वस्त्या, झोपडपट्टीत राहणारे आहेत. इथली सर्वात मोठी अडचण सार्वजनिक शौचालयांची आहे. घरी गेल्यानंतर कुटुंबाला वा शेजाऱ्यापाजाऱ्यांना बाधा होण्याची भीती आहे. दुसरीकडे केंद्रात दाखल रुग्णाला चाचणीशिवाय घरी पाठविण्यात येणार असल्याच्या बातमीने वस्त्यांमधील रहिवाशी अस्वस्थ झाल्याचे चित्र पाहायवास मिळत आहे.

असे आहे सुधारित धोरण

सौम्य, अतिसौम्य व लक्षणे नसलेले रुग्ण – आरोग्य संस्थांमध्ये दाखल या रुग्णांची दररोज दोन वेळा शरीराचे तापमान आणि पल्स ऑक्सिमीटरद्वारे एसपीओ-२ तपासणी करावी. रुग्णाला लक्षणे सुरू झाल्यापासून सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी ताप नसल्यास १०व्या दिवशी घरी पाठवावे. घरी पाठवताना करोना विषाणूसाठी प्रयोगशाळा तपासणीची गरज नाही. कोणतीही लक्षणे आढळत नसल्यास या रुग्णांना भविष्यात कोणती काळजी घ्यावी याबाबत सूचना करून करोना काळजी केंद्रातून घरी पाठवावे.

मध्यम लक्षण असलेले रुग्ण

करोना आरोग्य केंद्रात दाखल या रुग्णांच्या शरीराच्या तापमानाची व ऑक्सिजन सॅच्युरेशनची तपासणी करावी. तीन दिवसांत ताप कमी झालेल्या व पुढील चार दिवसांत अ‍ॅक्सिजन संपृक्ततेचे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असेल अशा रुग्णांना लक्षणे सुरू झाल्यापासून १० दिवस पूर्ण झाल्यानंतर घरी पाठवावे. घरी पाठवताना ताप नसणे, श्वास घेण्यास त्रास न होणे, प्राणवायू पुरवठय़ाची गरज नसणे या बाबी तपासून काही अटीसापेक्ष त्यांना घरी पाठवावे. अशा रुग्णांना घरी पाठवताना प्रयोगशाळा तपासणीची गरज नाही.