23 October 2020

News Flash

धारावीत परप्रांतीय कामगारांच्या चाचण्या

करोना संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी

करोना संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : धारावीतील बहुसंख्य कारखाने सुरू होऊ लागले असून कारखान्यांमध्ये परतलेल्या परप्रांतीय कामगारांमुळे करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी त्यांची करोना चाचणी करण्यात येत आहे. गेल्या ४० दिवसांमध्ये धारावीत केलेल्या १२०० पैकी ५२५ परप्रांतीयांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

धारावीत करोनाचे रुग्ण सापडू लागताच बहुसंख्य परप्रांतीयांनी मुंबईतून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. धारावीतून जवळपास दीड लाखाच्या आसपास परप्रांतीयांना गावची वाट धरली. धारावीमध्ये मोठय़ा संख्येने कारखाने असून अनेक वस्तूंची कारखान्यात निर्मिती केली जाते. खाद्यपदार्थापासून चामडय़ाच्या वस्तूंपर्यंत अनेक वस्तूंचा पुरवठा धारावीतून अन्य परिसरांतील दुकानांना केला जातो. करोनाचा संसर्ग वाढू लागताच हे सर्व कारखाने बंद पडले आणि कामगारांनी गाव गाठले. हाताला नसलेले काम, खिशातील संपलेले पैसे आणि पोटाची खळगी भरण्याची भ्रांत यामुळे परिस्थितीचा अंदाज घेऊन परप्रांतीय मुंबईत परतू लागले आहेत. यापैकी काही जण धारावीमधील आहेत.

मुंबईतील टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल होत असून अटीसापेक्ष दुकानांबरोबर कारखानेही सुरू होऊ लागले आहेत. धारावीमधील बहुसंख्य कारखाने सुरू झाले असून कामगारही कारखान्यात रुजू होऊ लागले आहेत. कारखान्यात रुजू होणाऱ्या कामगारांची करोना चाचणी करण्यात येत आहे. गेल्या ४० दिवसांमध्ये धारावीत परतलेल्या परप्रांतीयाची संख्या मोठी आहे, तर कारखान्यात रुजू होणाऱ्या कामगारांची करोना चाचणी करण्याची मागणी कारखान्याच्या मालकांकडून होऊ लागली आहे. या मागणीची दखल घेऊन पालिकेने आतापर्यंत कारखान्यांतील ५२५ कामगारांची करोना चाचणी केली आहे. परप्रांतांतून आलेल्या कामगारांमुळे धारावीत पुन्हा संसर्ग पसरू नये याची काळजी घेण्यासाठी या चाचण्या करण्यात येत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

आतापर्यंत धारावीमध्ये ३,३४७ जणांना करोनाची बाधा झाली होती. त्यापैकी २,८८२ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला धारावीतील १६२ करोनाबाधित रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कारखान्यांमध्ये कामाच्या निमित्ताने आलेल्या कामगारांची चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर धारावीतील रुग्ण संख्येत काहीशी वाढ झाली होती, मात्र आता पुन्हा नव्या रुग्णांची प्रतिदिन संख्या १०च्या खाली घसरली आहे. गेल्या १३ दिवसांमधील आकडेवारी लक्षात घेता १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत प्रतिदिन रुग्णसंख्या १० ते २२ च्या दरम्यान होती. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. धारावीमध्ये १ सप्टेंबरपासून १२ ऑक्टोबपर्यंत १२०० करोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी परप्रांतातून आलेल्या ५२५ जणांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

परराज्यांतील मूळ गावी गेलेले अनेक परप्रांतीय कामगार धारावीत परतू लागले आहेत. तसेच धारावीतील बहुसंख्य कारखाने आता सुरू झाले आहेत. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांची करोना चाचणी करण्यात येत आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत आहे.

– किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’

धारावीतील रुग्णसंख्या

३३४६ एकूण बाधित

२८८२ करोनामुक्त

३०२ मृत्यू

१६२ उपचाराधीन रुग्ण

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 1:48 am

Web Title: covid 19 test of migrant workers in dharavi zws 70
Next Stories
1 १२ दिवसांत एसटीतील ३२९ कर्मचारी करोनाबाधित
2 आणखी एका रुग्णाचा मृत्यू
3 मंजुरीसाठी स्थायी समितीकडे ६०० प्रस्ताव
Just Now!
X