25 February 2021

News Flash

करोना लशीची धास्ती!

दोन दिवसांच्या स्थगितीनंतर लसीकरणाला सुरुवात

वांद्रे येथील भाभा रुग्णालयातील लसीकरण केंद्रात पहिला डोस घेण्यासाठी हजर राहिलेले आरोग्य कर्मचारी.

दोन दिवसांच्या स्थगितीनंतर लसीकरणाला सुरुवात; निम्म्याच आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती

मुंबई : अ‍ॅपमधील गोंधळामुळे दोन दिवस स्थगित झालेले करोना लसीकरण पुन्हा एकदा मंगळवारपासून सुरू झाले. मात्र, लशीच्या डोसाचे विपरीत परिणाम होण्याच्या भीतीने आरोग्य कर्मचाऱ्यांकडून या मोहिमेला कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत पालिकेने आखलेल्या उद्दिष्टांपैकी जेमतेम ५० टक्केच लसीकरण पूर्ण होऊ शकले.

लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य विभागाने उपलब्ध केलेल्या को-विन अ‍ॅपमध्ये तांत्रिक त्रुटींमुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवशी पारंपरिक पद्धतीनेच लसीकरण केले गेले. त्यानंतर रविवार आणि सोमवारी तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी लसीकरण स्थगित करण्यात आले होते. अ‍ॅप कार्यरत झाल्यानंतर सोमवारी संध्याकाळी प्रत्येक केंद्राला लाभार्थ्यांची यादी तसेच लाभार्थ्यांनाही लसीकरणासाठी येण्याचे संदेश पाठविले गेले. मंगळवारी सकाळी नऊ ते पाच या वेळेत लसीकरण आयोजित केले होते. परंतु दुपारी १२ पर्यंत अनेक केंद्रांवर ५० लाभार्थीही लसीकरणासाठी आलेले नव्हते. शहरात मंगळवारी १ हजार ५०९ कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले.

नायरमध्ये ४०० लाभार्थ्यांची यादी पाठविलेली होती. प्रत्यक्षात ९० जण केंद्रावर लसीकरणासाठी आले होते. यातील दहा जणांना विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी असल्याने लस दिली नाही. तर सात जणांनी रुग्णालयात आल्यानंतर लस घेण्याचे नाकारले आणि ते परत गेले. आम्हाला जवळपास २०० ते ३०० लाभार्थी येण्याची अपेक्षा होती. त्या तुलनेत मात्र फारच कमी लाभार्थी आल्याचे रुग्णालयातील नोडल अधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. केईएममध्ये दुपारी १ पर्यंत १०० लाभार्थी आले होते. संध्याकाळी ५ पर्यंत जवळपास ३१० लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले होते, अशी माहिती रुग्णालयाचे सामाजिक औषधशास्त्र विषयाचे प्रमुख डॉ. वेल्हाळ यांनी दिली.

मुंबईत नऊ केंद्रांसाठी चार हजार लाभार्थी एका दिवसात करण्याचे लक्ष्य आहे. त्यानुसार सोमवारी रात्री अ‍ॅपच्या माध्यमातून यादी केंद्राना मिळाली. परंतु या यादीत एक हजार लाभार्थ्यांची नावे दोन वेळेस आली होती. त्यामुळे प्रत्यक्षात तीन हजार लाभार्थ्यांना बोलाविले गेले. तसेच लसीकरण केंद्र असलेल्या विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे यादीत येत आहेत. प्रत्येक विभागात केंद्र आहे असे नाही. त्यामुळे सर्व विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे येणे गरजेचे आहे. याबाबत काही सुधारणा राज्य सरकारकडे कळविल्याचे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

यादीत नावे समाविष्ट करण्याची मुभा

अ‍ॅपमधून आलेल्या यादीनुसारच लसीकरण करावे, त्याबाहेरील व्यक्तीला लस देऊ नये. तसेच एकदा यादीत नाव येऊन गेल्यास पुन्हा नाव येईपर्यंत थांबावे लागेल अशी सक्त ताकीद पालिकेने मंगळवारी सकाळी केंद्रांना दिली होती. परंतु दुपापर्यंत अनेक केंद्रांवर अपेक्षेपेक्षा फार कमी लाभार्थी लसीकरणासाठी आले. तेव्हा अखेर यादीमध्ये रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे जोडण्याची मुभा देण्याची सुविधा अ‍ॅपमध्ये दुपारनंतर उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे अनेक केंद्रांनी त्यांच्याच रुग्णालयातील इच्छुक आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे यादीत जोडून लसीकरण करून घेतले.

तांत्रिक अडचणी सुरूच

सकाळी दोन तास अ‍ॅप बंद पडले होते. परंतु दुपारनंतर अ‍ॅप सुरळीत सुरू झाल्याची माहिती कांदिवली शताब्दी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. लाभार्थ्यांची नोंदणी होण्यास अद्यापही अ‍ॅपवर बराच वेळ लागत असल्याचे सांगण्यात आले.

केंद्रानुसार लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांची संख्या

३१० के ईम रुग्णालय

७७ नायर रुग्णालय

११० लो. टिळक रुग्णालय

९० भाभा रुग्णालय (वांद्रे)

१०५ बीके सी आरोग्य केंद्र

२३६ शताब्दी रुग्णालय

२८० राजावाडी रुग्णालय

२२९ कूपर रुग्णालय

५९ व्ही. एन. देसाई रुग्णालय (सांताक्रुझ)

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2021 2:10 am

Web Title: covid 19 vaccination begins in mumbai after a two day postponed zws 70
Next Stories
1 अग्निसुरक्षेपासून पालिका अलिप्त?
2 डॉ. भाभा विद्यापीठाला स्थापनेपासून निधीची प्रतीक्षा
3 गर्दुल्ल्यांच्या व्यसनमुक्तीसाठी रेल्वेचा पुढाकार
Just Now!
X