लसीकरणाची सत्रे रात्री ९ नंतर खुली

मुंबई : १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठीची नोंदणी सत्रे रात्री नऊनंतर खुली होत असून लॅपटॉपवरून नोंदणी केल्यास सत्रे लवकर आरक्षित करता येतील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. सत्रे खुली झाली तरी काही क्षणातच आरक्षित होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

लसीकरणासाठी नोंदणी करून वेळ आरक्षित करणे आता पालिकेने बंधनकारक केले आहे. नोंदणी करणे तुलनेने सोपे असले तरी ती करताना नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. दिवसभरात केव्हाही संकेतस्थळ किंवा अ‍ॅपवरून नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्यास सत्रे आरक्षित असल्याचे दिसत असल्याने नेमकी सत्रे केव्हा आरक्षित होतात, अशी चर्चा व्हायला लागली. त्यानंतर पालिकेने संध्याकाळी सातनंतर नोंदणी सुरू केली जाईल, असे जाहीर केले. मात्र त्यानंतरही पुढील काही वेळेतच केंद्र आरक्षित होत असल्याने अनेकांना लसीकरणाची वेळ घेताच आलेली नाही. त्यामुळे ४५ वर्षांवरील काही नागरिकांची लशीची दुसरी मात्रा देखील रखडली आहे. लशीचा साठा अनियमित येत असल्याने उपलब्ध साठय़ावरून कोणती केंद्रे खुली करायची याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे आता पालिकेने वेळ बदलून रात्री नऊनंतर नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वेळ आरक्षित करण्यात अडचणी येत असलेल्या नागरिकांना प्रत्युत्तर देताना पालिकेने मोबाइलऐवजी लॅपटॉप किंवा मोठय़ा स्क्रीनचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

१८ ते ४४ वयोगटासाठी आता आठ केंद्रे

नायर, बीकेसी, सेव्हन हिल्स, राजावाडी, कूपर, वर्ल्ड टॉवर, चुनाभट्टी प्रसूतिगृह, कम्युनिटी हॉल वांद्रे

ट्विटरवरूनच अद्ययावत माहिती

पालिकेने लसीकरणासाठी उपलब्ध असलेल्या केंद्रांची माहिती, कोव्हॅक्सिन उपलब्ध असलेली केंद्रे, वेळ, नोंदणी यांबाबतची अद्ययावत माहिती पालिकेच्या ट्विटर हँडलवर दिली जाते. पालिकेने मंगळवारी दिवसभरातही काही केंद्राची सत्रे नोंदणीसाठी खुली केल्याची माहितीही ट्विटरवर दिली. सर्वसामान्य नागरिक ट्विटरचा वापर करतातच असे नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यत ही माहिती पोहोचत नाही.