संदीप आचार्य

आरोग्य विभागाची संपूर्ण ताकद करोना रुग्णोपचारात व्यस्त असल्याचा मोठा फटका सामान्य आजारांच्या रुग्णांना व शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना बसला आहे. गेल्या वर्षभरात आरोग्य विभागाच्या बहुतेक रुग्णालयांचे रुपांतर करोना उपचार रुग्णालयात करण्यात आल्यामुळे सामान्य रुग्णोपचार व शस्त्रक्रियांत ५० टक्के घट झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मुंबई महापालिकेने ज्याप्रकारे तात्पुरते जम्बो करोना रुग्णालये मुंबईत सुरु केली तशी रुग्णव्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाला राज्यात करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. महापालिका क्षेत्रात एकवटलेली लोकसंख्या व ग्रामीण भागातील विखुरलेल्या लोकसंख्येमुळे मुंबईत तात्पुरती जम्बो करोना रुग्णालये खार्चिक असूनही उभारणे करोना रुग्णसंख्या लक्षात घेता योग्य होते. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांपासून ग्रामीण रुग्णालयांपर्यंतच्या आरोग्य व्यवस्थेचे करोना रुग्णोपचारात रुपांतर केले. त्याचबरोबर उपलब्ध डॉक्टर, परिचारिका व अन्य आरोग्य वर्ग करोना रुग्णोपचारात वापरण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका ग्रामीण भागातील विविध आजारांवरील उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यात वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचे रुग्ण तसेच डोळ्याच्या शस्त्रक्रियांपासून गर्भवती महिलांच्या बाळंतपणापर्यंत आणि मधुमेह व उच्च रक्तदाब विकारामुळे निर्माण होणाऱ्या विविध आजारांच्या रुग्णांना आरोग्य विभागाच्या रुग्णालयात उपचार मिळू शकलेले नाहीत. हे प्रमाण २०१९- २० या वर्षाच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये जवळपास निम्मे झालेले दिसून येते. आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मिळून २०१९-२० मध्ये बाह्यरुग्ण विभागात ६,५४,१६,६५७ रुग्णांनी उपचार घेतले तर ४,८८,०५३६ एवढे रुग्ण दाखल झाले होते. २,३६,७६७ मोठ्या शस्त्रक्रिया केल्या गेल्या तर याच काळात २,९९,४०६ छोट्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. याशिवाय ८,२२,४९७ क्ष-किरण तपासणी, ४७,०१२ सीटी स्कॅन आणि ८१,९६१ डायलिसिस करण्यात आले होते. करोना वर्षात म्हणजे २०२०-२१ मध्ये बाह्यरुग्ण विभागात ३,२७,९५,५४८ रुग्णांवर उपचार केले तर २६,३८,२७१ रुग्णांवर दाखल करून उपचार करण्यात आले. मोठ्या शस्त्रक्रिया फक्त ९६,८८२ झाल्या तर एक लाख ७२,४९४ छोट्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ५,१८,८९५ क्ष-किरण तपासणी आणि ६७,७७० डायलिसीस या काळात होऊ शकली. टक्केवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास उणे ४९.८७ टक्के बाह्यरुग्ण, उणे ४५.९४ टक्के आंतररुग्ण, उणे ५९ टक्के मोठ्या तर उणे ४२ टक्के छोट्या शस्त्रक्रिया या काळात झाल्या आहेत. क्ष-किरण तपासणी उणे ३६.९१ टक्के तर डायलिसीस उणे १७.३१ टक्के झाली आहे.

आरोग्य विभागाच्या ज्येष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार शासनानेच अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता नियमित शस्त्रक्रिया करणे थांबविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आरोग्य विभागातील डॉक्टरांसह सर्व कर्मचारी करोना रुग्णांवरील उपचारात गुंतल्यामुळे त्याचा परिणाम बाह्यरुग्ण व आंतररुग्णांवर स्वाभाविकपणे झाला. तरीही जेवढे शक्य होईल तेवढे बाह्यरुग्ण तपासणी करून आवश्यकतेनुसार अन्य आजारांच्या रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले. यात गर्भवती महिला, वेगवेगळ्या आजारांचे रुग्ण, कॅन्सर रुग्णांपासून अनेकांना दाखल करण्यात आले आहे. आरोग्य विभागात डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासह आरोग्य संचलनालयातील जवळपास २०,८८२ पदे रिक्त असतानाही अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या तसेच आरोग्य संचालक डॉ साधना तायडे, डॉ अर्चना पाटील तसेच अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार यांच्या योग्य नियोजनामुळे करोना रुग्ण व्यवस्थापन तसेच अत्यावश्यक शस्त्रक्रिया यांचा समन्वय साधता आल्याचे आरोग्य विभागातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. गेल्या दहा वर्षात रुग्णोपचारात दीड कोटी वरून साडेसहा कोटी एवढी वाढ झाली मात्र आरोग्य विभागाला ना पुरेसा निधी सरकारकडून मिळतो ना पदे भरली जातात असेही डॉक्टरांनी सांगितले. करोना काळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा करोना रुग्णसेवेसाठी धावत असल्यामुळेच गेल्या वर्षभरात बाह्यरुग्ण, आंतररुग्ण तसेच शस्त्रक्रियांचा वेग मंदावल्याचे अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार यांनी सांगितले.