मुंबई, ठाणे विभागांतील करोनाबाधित एसटी कर्मचाऱ्यांवर उपचार

मुंबई : एसटीच्या करोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडा वाढत असल्याने अखेर एसटी महामंडळाने करोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांवर योग्य वेळी उपचार व्हावे यासाठी मुंबई सेन्ट्रल आगारातील चालक-वाहकांच्या विश्रामगृहात करोना सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिके शी चर्चा करूनच अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

कामगारांची वाहतूक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी सेवा दिल्यानंतरही एप्रिल, मे महिन्यापर्यंत एसटीचा एकही कर्मचारी करोनाबाधित नव्हता. मात्र जून महिन्याच्या १५ तारखेनंतर करोनाबाधित कर्मचारी आढळून येऊ लागले. सध्याच्या घडीला राज्यात एसटीचे २७७ करोनाबाधित कर्मचारी असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ११७ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले, तर १५४ कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई सेन्ट्रल, कु र्ला नेहरूनगर, परळ, पनवेल, उरण आगारात मिळून ९७ आणि  ठाणे विभागाच्या खोपट, वंदना चित्रपटगृह, कल्याण, भिवंडी, शहापूर आगारांत ११३ कर्मचारी आहेत. दररोज सरासरी दोन ते चार करोनबाधित एसटी कर्मचाऱ्यांची भर पडत आहे.

करोनाच्या धास्तीने एसटीचे अनेक कर्मचारी गावी निघून गेले. म्हणून मुंबईतच करोना सेंटर उभारण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. यासाठी पालिके ची मंजुरी आवश्यक असून करोना सेंटरही त्यांच्याच देखरेखीखाली उभारले जाईल. हे सेंटर एसटीच्या मुंबई सेन्ट्रल आगारातील चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात (रेस्ट रूम) करण्याचा विचार आहे. सध्या येथे दोन विश्रांतीगृह असून एक आगारातील चालक-वाहकांसाठी आणि दुसरा राज्याच्या कानाकोपऱ्यातून एसटी बस घेऊन येणाऱ्या चालक-वाहकांसाठी आहे.

उपचार सुरू

मुंबई महानगर परिसरातील करोनाबाधित एसटी चालक, वाहक तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांवर उपचार सुरू आहेत. तसेच करोनाच्या धास्तीने अनेक चालक, वाहक आपापल्या गावी निघून गेले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीची एसटी सेवा ठप्प होऊ नये म्हणून राज्यातील अन्य आगारातून चालक-वाहकांना बोलावण्यात आले आहे.

मुंबई सेन्ट्रल येथील आगारात करोना सेंटर उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी मुंबई पालिके ची मंजुरी आवश्यक आहे.

अनिल परब, परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष