26 November 2020

News Flash

रुग्णालयाच्या शौचालयात १४ दिवस करोना रुग्णाचा मृतदेह होता पडून; मुंबईतील धक्कादायक घटना

शिवडी येथील टीबी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे

गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या करोना रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईमधील शिवडी येथील टीबी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. शौचालयांचा इतर रुग्णांकडून वापर होत असताना तसंच ते रोज स्वच्छ करण्याची अपेक्षा असतानाही १४ दिवस मृतदेह तिथे पडून होता आणि याबद्दल कोणालाही माहिती मिळाली नाही यावरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महापालिकेने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून वॉर्डमध्ये काम करणाऱ्या जवळपास ४० कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.

१४ दिवसांपासून मृतदेह पडून असल्याने पूर्पपणे सडलेल्या अवस्थेत आहे. यामुळे रुग्णाची ओळख पटवणंही कठीण झालं असून स्त्री आहे की पुरुष याची माहिती मिळवण्यासाठी रेकॉर्ड तपासण्यात आला. यावेळी २७ वर्षीय सूर्यभान यादव नावाचा रुग्ण ४ ऑक्टोबरपासून वॉर्डमधून बेपत्ता असल्याचं लक्षात आलं. “आम्ही बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पण टीबी रुग्णांनी रुग्णालयातून पळून जाणं येथे नवीन नाही,” असं अक्षीक्षक डॉक्टर ललितकुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं आहे.

सूर्यभान यादव करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ३० सप्टेंबरला रुग्णालयात दाखल झाले होते. गोरेगावमधील डॉक्टराने त्यांना तिथे पाठवलं होतं. सूर्यभान यांनी दाखल होताना आपला पत्ता व्यवस्थिपणे दिला नव्हता असं डॉक्टराने सांगितलं आहे. रुग्णालयात एकूण ११ करोना रुग्ण असून सूर्यभान यांनी पहिल्या मजल्यावर पुरुषांसाठी असणाऱ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. ४ ऑक्टोबरला शौचालयासाठी गेल्यानंतर श्वसनाचा त्रास झाल्याने ते तिथेच कोसळले असावेत अशी शक्यता व्यक्त होत आहे.

एकाही कर्मचाऱ्याला स्वच्छता करताना मृतदेहाची माहिती कशी मिळाली नाही यासंबंधी विचारलं असता डॉक्टर ललितकुमार यांनी सांगितलं की, “दिवसातून तीन वेळा शौचालयं स्वच्छ केली जातात. अनेकदा शौचालयांमध्ये रुग्ण असल्याने कर्मचारी त्याची स्वच्छता न करता निघून जातात. पण रुग्ण रोज वापर करतात, त्यामुळे त्यांना दुर्गंध यायला हवा होता. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे”.

रुग्णालयातील एका डॉक्टरने कोविड वॉर्ड असल्याने तिथे इतर कोणी कर्मचारी जात नाहीत अशी माहिती दिली आहे. बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कोविड वॉर्ड असल्याने आम्हीदेखील प्रभागात प्रवेश करणे किंवा शौचालयांची तपासणी करणे टाळले असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. दरम्यान केईएम रुग्णालयाचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर हरिश पाठक यांनी नैसर्गिक कारणामुळे सूर्यभान यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत असून यामागे इतर काही कारणं आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 8:51 am

Web Title: covid patient found dead in hospital toilet in sweri tb hospital mumbai sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 मुंबई सेंट्रलमधील आग ३५ तासांनंतरही धुमसतीच; आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
2 परीक्षा घेण्याच्या सूचना नसल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे शाळांना पत्र
3 ‘सिटी सेंटर’मध्ये अग्नितांडव
Just Now!
X