आतापर्यंत केवळ पाच जणांनाच ‘झायडस कॅडिला’च्या मात्रा

मुंबई : नायर रुग्णालयात १२ ते १७ वयोगटातील बालकांवर झायडस कॅडिला कंपनीच्या करोना प्रतिबंधात्मक लशींच्या चाचण्या सुरू होऊन दोन आठवडे झाले असून त्याला प्रतिसाद अत्यल्पच आहे. त्यामुळे या चाचण्या यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन रुग्णालयाने केले आहे.

अहमदाबादस्थित झायडस कॅडिला कंपनीने निर्मिती केलेल्या ‘झेडवायकोवि-डी’ या लशींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या १२ ते १७ वर्षांच्या बालकांवर सुरू केल्या आहेत. मुंबईत पालिकेच्या नायर रुग्णालयात प्रथम या चाचण्या सुरू झाल्या आहेत. दोन आठवडय़ापासून सुरू असलेल्या या चाचण्यांमध्ये आतापर्यंत पाच बालकांचे लसीकरण झाले आहे. या बालकांना कोणताही त्रास झालेला नाही. चाचण्यांमध्ये पहिल्या टप्प्यात ५० बालकांचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली.

लस दिलेल्या बालकांना कोणतेही दुष्परिणाम जाणवलेले नाही. परंतु बालकांच्या बाबतीत पालक अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे चाचण्यांमध्ये सहभागी होऊन लस देण्यासाठी फारसे पालक तयार होत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत केवळ पाच बालकांचे लसीकरण होऊ शकले आहे, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

लस देण्यापूर्वी बालकाच्या पालकांची लेखी संमती घेतली जाते. चाचण्याअंतर्गत बालकांना तीन मात्रा देण्यात येणार असून यात सहभागी झालेल्या बालकांना अन्य लस घेता येणार नाही. पहिल्या मात्रेनंतर २८ आणि ५६ दिवसांच्या अंतराने दुसरी आणि तिसरी मात्रा देण्यात येणार आहे. तीन महिने या बालकांचा पाठपुरावा केला जाईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

सहभाग कुणाचा..

१२ ते १७ वयोगटातील आरोग्यदृष्टय़ा सुदृढ बालकांना ही लस घेता येणार आहे. तसेच बालकांना या आधी करोनाची बाधा झालेली नसावी आणि प्रतिपिंडे निर्माण झालेली नसावीत.

संपर्कासाठी..    

चाचण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी बालकांच्या पालकांनी ०२२-२३०२७२०५, ०२२-२३०२७२०४  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रुग्णालयाने केले आहे.

५० बालकांपैकी ५० टक्के बालकांना प्लासिबो दिला जाणार आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आम्ही त्यांच्या बालकांना लसीकरणात सहभागी करण्याचे आवाहन केले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये अधिकांश बालकांना करोनाची बाधा झाली होती. त्यामुळे ही लस प्रभावी ठरल्यास बालकांसाठी लस उपलब्ध होईल.

      – डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय