कल्याण येथील आधारवाडी कचराभूमीवर कोविड जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. किंबहुना त्यासाठी उंबरडे येथे विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचा दावा कल्याण-डोंबिवली पालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उच्च न्यायालयात केला आहे.

कोविड जैववैद्यकीय कचऱ्यावर कुठलीही शास्त्रीय प्रक्रिया न करता तो कल्याण येथील आधारवाडी क्षेपणभूमीवर टाकला जात असल्याच्या याचिकेतील आरोपाची न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी गंभीर दखल घेतली होती. तसेच राज्य सरकार, कल्याण—डोंबिवली पालिकेला उत्तर दाखल करण्याचे आदेश देताना महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला आधारवाडीला भेट देऊन याचिकेतील आरोपांत तथ्य आहे की नाही हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

डोंबिवलीस्थित किशोर सोहोनी यांनी केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड शर्मिला देशमुख यांनी तसेच पालिकेतर्फेही प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. पालिकेने याचिकेतील सगळ्या आरोपांचे खंडन केले.

तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी आधारवाडी कचराभूमीला भेट दिली. त्या वेळी तेथे कोविड जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावल्याचे आढळून आले नाही. पालिकेकडून या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी उंबरडे येथे स्वतंत्र प्रकल्प असून तेथे त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येते, असेही मंडळाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.