30 November 2020

News Flash

विक्रेते, फेरीवाल्यांच्या चाचण्या सुरू

हॉटेलांमधील आचारी आणि वाढप्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

संग्रहीत

हॉटेलमधील आचारी, वाढप्यांची तपासणी

प्रसाद रावकर, लोकसत्ता

मुंबई : करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत मुख्य बाजारपेठा आणि मंडयांमध्ये विक्रेते, फेरीवाले आदींच्या चाचण्या करण्यात येत असून हॉटेलांमधील आचारी आणि वाढप्यांच्या चाचण्या करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.

गर्दीची ठिकाणे हेरून मनीष मंडई, जनता मंडई, सावरकर मंडई, फुलबाजार, कीर्तिकर भाजी मंडई, तसेच न. चिं. केळकर मार्ग, सेनापती बापट मार्ग आणि आसपासच्या परिसरांतील फेरीवाल्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये दुकानदार आणि फेरीवाले असे मिळून साधारण ५३५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्याचबरोबर धारावीतील पालिकेच्या आरोग्य केंद्रांवरही चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार धारावीमध्ये पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी सत्र सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे.

समुद्रकिनाऱ्यांवर छटपूजा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तरी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेत दादर चौपाटीवरही शुक्र वार-शनिवारी सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत करोना चाचण्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ‘जी-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कुंभारवाडा, श्री सिनेमा, ट्रॅन्झिट कॅम्प, माटुंगा लेबर कॅम्प, शाहूनगर, बाई गुलबाई, वेलकरवाडी, पिवळा बंगला, मुख्य रोड आदी ठिकाणच्या आरोग्य केंद्रांमध्ये सोमवार ते शनिवारदरम्यान ठरावीक वेळेत करोना चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणावर करोना चाचण्या करून बाधित आणि त्यांच्या संपर्कातील संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. धारावीत करोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर काही संस्थात्मक विलगीकरण केंद्रे बंद केली होती. करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही केंद्रे पुन्हा सज्ज करण्यात आली आहेत. गरज पडल्यास ही संस्थात्मक विलगीकरण केंद्रे पुन्हा सुरू करण्याचा पालिकेचा विचार आहे.

मुंबईमधील हॉटेल्स मर्यादित क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. हॉटेलमधील आचारी, वाढप्यांमुळे संसर्ग पसरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन या परिसरातील हॉटेल्समधील आचारी आणि वाढप्यांची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

धारावीत ११ रुग्ण

धारावीमधील ३,६२९ रहिवाशांना करोनाची बाधा झाली होती. त्यापैकी ३,३०७ रुग्ण करोनामुक्त झाले असून ३११ रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला तेथे ११ रुग्ण उपचार घेत आहेत. दादरमधील ४,४६२ रहिवाशांना करोनाची बाधा झाली असून त्यापैकी ४,१८४ रुग्ण बरे झाले आहेत, तर १७० रुग्णांचा मृत्यू झाला असून १०८ रुग्ण उपचाराधीन आहेत. माहीममधील ४,२३१ करोनाबाधितांपैकी ३,८३२ रुग्ण करोनामुक्त झाले असून १४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर येथील २५७ रुग्ण उपचार घेत आहेत.

दाटीवाटीची वस्ती असलेली धारावी आणि मुख्य बाजारपेठा असलेल्या दादर भागात करोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. आरोग्य केंद्रांमध्येही चाचण्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. करोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्यात येत आहेत.
किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘जी-उत्तर’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 2:29 am

Web Title: covid19 test for hotel staff dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 सागरी सेतूच्या कामासाठी जुहू किनारी अवैध रस्त्याचे बांधकाम
2 वाहतूक पोलिसांच्या ‘चापा’चा वाहनमालकांना ताप!
3 कोंडवाडय़ात गुरांचा कोंडमारा?
Just Now!
X