कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशीच्या १९१.९९ लाख मात्रा १६ ते ३१ मे या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.

या लशींचे कशा पद्धतीने वितरण केले जाणार आहे त्याचा तपशील अगोदर देण्यात येणार आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी संबंधित अधिकाऱ्यांना या लशींच्या वापराबाबत योग्य त्या सूचना द्याव्या आणि लशींचा अपव्यय होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

या १९१.९९ लाख मात्रांपैकी १६२.५ लाख मात्रा कोव्हिशिल्डच्या आहेत, तर २९.४९ लाख मात्रा कोव्हॅक्सिनच्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना किती लशी उपलब्ध होणार आहेत त्याची आगाऊ सूचना देण्यामागे त्यांनी परिणामकारक योजना आखण्याचा उद्देश आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.