महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदी सामाजिक सलोखा राखण्यासाठीच असून त्याचे समर्थन करीत बेरोजगारांनी रोजगार हमी योजनेवर (मनरेगा) काम करावे आणि कौशल्यविकास उपक्रमात प्रशिक्षण घेऊन रोजगार मिळवावा, असा सल्ला भाजपचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी गोमांसव्रिकी करणाऱ्या मुस्लिम व्यावसायिकांना शनिवारी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने सरकारच्या कामगिरीविषयी हुसेन यांनी प्रदेश कार्यालयात माहिती दिली. देशाचे संविधान, संस्कृती यासह खाद्यसंस्कृतीही एकच आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. या व्यवसायातील बेरोजगारांना मनरेगामध्ये १०० दिवस काम मिळेल. कौशल्यविकास उपक्रमात काहीतरी शिकून रोजगार मिळवावा. त्याचबरोबर ‘मेक इन इंडिया’ अभियान राबविले जात असून उद्योगधंदे वाढत आहेत. त्यातही त्यांना रोजगार मिळेल, असे हुसेन यांनी स्पष्ट केले.