सुट्टीच्या दिवशी तरुण मुला-मुलींनी ‘नाइटआऊट’साठी एकत्र या. सामाजिक प्रश्न, साहित्य, इतिहास यांवर चर्चा करा. जातीधर्माच्या पलीकडे जाणारा समाज निर्माण करा, असे आवाहन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केले. छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे ३७वे राज्य अधिवेशन शनिवारी राजा शिवाजी विद्यालयाच्या बी. एन. वैद्य सभागृहात पार पडले. डॉ. देवी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जाती-धर्माचा विचार न करता लग्न करण्याचा निर्णय घेतलेले युवक-युवती या वेळी हजर होते.

तुम्ही म्हणताय तसा ‘नाइटआऊट’ करायला आम्हाला आवडेल. पालक परवानगी देत नसतील तर आम्ही बंड करू, असे एका विद्यार्थिनीने सांगितले. तसेच ‘जातीपातीचा विचार न करता लग्न करावे असे आम्हाला वाटते, पण आमच्या आईवडिलांना कसे समजवायचे?’ असा प्रश्न एका विद्यार्थ्यांने विचारला. या दोन्ही मुद्दय़ांवर उत्तर देताना डॉ. देवी यांनी सांगितले, आपले मूल सुखात राहावे अशीच प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. कौटुंबिक, सामाजिक दबावामुळे ते तसे वागत असतात. त्यामुळे आई-वडिलांना दुखवू नका. त्यांच्याशी संवाद साधा. त्यांना आपली भूमिका पटवून द्या, असा सल्ला त्यांनी दिला.

एखाद्या वेळेस परिस्थिती अधिक गंभीर असल्यास पालकांच्या सुखासाठी तुम्हाला जात बघून लग्न करावे लागेल. अशा वेळी जो जुलूम तुमच्यावर झाला तो तुमच्या मुलांवर होणार नाही याची काळजी घ्या. कोणताही बदल एका पिढीत घडत नसतो. त्यासाठी काही पिढय़ा जाऊ द्याव्यात, असेही डॉ. देवी म्हणाले.

आपण एका राष्ट्रात राहतो म्हणजे एकच वेष परिधान करावा, एकच गोष्ट खावी असे सांगितले जात आहे. ही विचारांवरील शस्त्रक्रिया म्हणजे हुकूमशाही आहे.

सध्या सुरू असलेला सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील लढा भारतीय स्वातंत्र्यलढय़ापेक्षाही वेगळा आहे. यात कायद्याची किंवा राजकारणाची चर्चा नाही, तर भारतातल्या ‘माणसा’ची चर्चा आहे. त्यामुळे हा लढा भारताचा पुढील दशकांतील चेहरा ठरवेल, अशी आशा डॉ. देवी यांनी व्यक्त केली.

‘द्वेश संपला की जात संपेल’

जेथे जमिनीच्या मालकीची स्पर्धा असते तेथे स्त्री ही उत्पादक भूमी असते. एकेकाळी बंजारा समाज हंगेरीपर्यंत पोहोचला होता. इंग्रजांनी रेल्वे सुरू करण्यासाठी त्यांच्या जमिनी हिरावून घेतल्या. त्यामुळे हुंडा कमी करायचा असेल तर उत्पादनाच्या नवनवीन पद्धती शोधून काढाव्या लागतील. तोपर्यंत हुंडा घ्यायचा नाही असा नियम तुम्ही स्वत:पुरता बनवून घ्या, असे डॉ. देवी म्हणाले. जातीभेद हा तिरस्कारावर आधारलेला आहे. जेव्हा द्वेष संपेल तेव्हाच जात संपेल. ज्याला अन्यायाची चीड आहे. पण तो हिंसा करत नाही, त्याच्याकडे नीतिमत्ता असते, असे म्हणत त्यांनी प्रेमाने जातीभेद संपवण्याचे आवाहन तरुणांना केले.