News Flash

कैद्यांकरवी ‘मास्क’ची निर्मिती

नागरिकांसाठी हे मास्क बाजारात उपलब्ध करण्याबरोबरच पोलीसही याच मास्कचा वापर करत आहेत.

संग्रहित छायाचित्र

 

तीन दिवसांत एक लाखांहून अधिक ‘मास्क’चे उत्पादन

मुंबई : ‘करोना’ बाधितांची संख्या जसजशी वाढत चालली आहे तसतशी भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांची ‘मास्क’ घेण्यासाठी धडपड सुरू आहे. त्यामुळेच ‘करोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नागरिकांना पुरेसे मास्क उपलब्ध व्हावेत, त्याचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आता राज्यातील विविध कारागृहातील कैदी सरसावले आहेत. गेल्या तीन दिवसांत राज्यातील विविध कारागृहातील हजाराहून अधिक कैद्यांनी एक लाखापेक्षा अधिक ‘मास्क’चे उत्पादन केले आहे. ‘महाराष्ट्रातील कारागृह मास्क’ असे नाव या मास्कना देण्यात आले आहे.

नागरिकांसाठी हे मास्क बाजारात उपलब्ध करण्याबरोबरच पोलीसही याच मास्कचा वापर करत आहेत. एवढेच नव्हे, तर सरकारी कार्यालयांतील विविध विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हे मास्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुरवठय़ानुसार ‘मास्क’चा पुरवठा केला जाईल. पोलीस विभाग, सरकारी कर्मचाऱ्यांना हे ‘मास्क’ उपलब्ध करण्यासह वितरकांच्या मार्फत ते लोकांनाही उपलब्ध केले जातील, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही स्पष्ट केले आहे. या मास्कचे कैद्यांना पैसे देण्यात येणार आहेत.

‘मास्क’ची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्यातील सगळ्या मध्यवर्ती कारागृहातील आरोपींच्या माध्यमातून ‘मास्क’चे उत्पादन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, पुणे, अमरावती, नाशिक, नागपूर, अकोला आणि कोल्हापूर येथील कारागृहांमध्ये हे कापडांचे ‘मास्क’ तयार करण्यात येत आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये एक लाख ‘मास्क’ तयार करण्यात आले आहेत.

हे ‘मास्क’ तयार करणाऱ्या कैद्यांची सुरक्षा आणि स्वच्छताही कटाक्षाने पाहिली जाते. ज्या कैद्यांना सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात येते. त्यांना हे ‘मास्क’ उपलब्ध करण्यात येत असून या कैद्यांना हात स्वच्छ धुतल्यानंतरच कारागृहात प्रवेश दिला जात आहे. कैद्यांच्या स्वच्छतेसाठी साबण आणि पाण्याच्या सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे.

एवढेच नव्हे, तर नव्या कैद्यांचीही तपासणी करूनच त्यांना कारागृहात नेण्यात येते. ठाणे आणि कल्याण कारागृहातील कैद्यांनी बनवलेले मास्क हे आर्थर रोड आणि भायखळा येथील कैद्यांसाठी उपलब्ध केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2020 1:15 am

Web Title: creation corona mask akp 94
Next Stories
1 १९ उपनगरीय स्थानकांच्या विकासाला गती
2 करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रस्त्यांवर थुंकणाऱ्यांवर कारवाई
3 करोनामुळे धार्मिक स्थळे बंद