मुंबई : करोनाच्या पाश्र्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आरोग्य संचालक (शहर) या पदासह आणखी सहा नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शहरी भागासाठी संचालक, आरोग्य सेवा (शहर), उपसंचालक-२ पदे, सहायक संचालक-४ पदे अशी ही नवी यंत्रणा असणार आहे.

नवनिर्मित पदांबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले की, शहरी भागांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय ठेवण्याची जबाबदारी संचालक (शहर) आरोग्य सेवा यांची असणार आहे. त्याचबरोबर महापालिका व नगरपालिका क्षेत्रांतील आरोग्य सेवेसोबतच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची नियमितपणे देखभाल, परीक्षण व नियंत्रण करतानाच त्यांचा आढावाही त्यांनी घ्यायचा आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी कार्यक्षेत्रातील आरोग्य सुविधांची कमतरता आरोग्य व नगरविकास विभागाच्या सचिवांना निदर्शनास आणून देतानाच कार्यक्षमता वाढीसाठी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारी शहरी आरोग्य संचालकांची असणार आहे. साथरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे तसेच आरोग्य सेवा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरविकास विभाग यांच्यात समन्वयाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर असणार आहे.

काम काय ? : संचालक (शहर) यांच्या सोबत उपसंचालक राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, उपसंचालक संसर्गजन्य रोग नियंत्रण तसेच कुटुंब कल्याण, इतर आरोग्य कार्यक्रम, जलजन्य/कीटकजन्य आजार आणि इतर सांसर्गिक/असांसर्गिक आजार या विभागांसाठी चार सहायक संचालक असतील. राज्यातील शहरी भागामध्ये लसीकरण, साथ रोग व इतर आरोग्यविषयक कार्यक्रम अधिक परिणामकारकतेने राबविण्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत राहील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.