शैलजा तिवले

करोना संसर्गापासून रक्षण करण्यासाठी मास्कसह वैयक्तिक सुरक्षा साधनांच्या तुटवडय़ावर मात करण्यासाठी संपूर्ण चेहरा झाकण्यासाठीचे फेस शील्ड, पर्यावरणपूरक कापडाचे मास्क आता बाबा आमटेंची महारोगी सेवा समिती संस्था करणार आहे.

करोनाविरुद्ध लढा देण्यासाठी संस्था सज्ज झाली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, छत्तीसगढ या भागात सध्या करोनाबाधित रुग्ण आढळलेला नसला तरी शहरांमधील अनेक विद्यार्थी गावाकडे परतले आहेत. राज्यभरात झपाटय़ाने पसरणारा हा संसर्ग इथल्या गावापर्यत कधी पोहचेल हे सांगता येणार नाही. तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेचे हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि  आनंदवन या दोन प्रकल्पांमध्ये प्रतिबंधात्मक सुरक्षा साधनांची निर्मिती केली जात आहे.

चंद्रपूरमध्ये सध्या कोणत्याच प्रकारचे मास्क उपलब्ध नाहीत. अत्यावश्यक सेवा देणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी,आशा, दुकानदार हे मास्कशिवायच वावरत आहेत. दुरावा पाळत असले तरी लोकांच्या सतत संपर्कात येणाऱ्या या व्यक्तींनी पूर्वकाळजी म्हणून मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तेव्हा यांच्यासाठी म्हणून मास्कची निर्मिती सुरू केली, असे आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे यांनी सांगितले.

रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण विभागात तपासणी करणाऱ्या डॉक्टरांकडे कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांकडे पीपीईसह अन्य काही गोष्टींची मागणी आम्ही केली आहे. परंतु तोपर्यत उपलब्ध बाबींचा वापर करत  सुरक्षा साधने तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे लोकबिरादरी प्रकल्पाच्या डॉ.अनघा आमटे यांनी सांगितले.  दिल्लीत एम्स रुग्णालयातील मैत्रिणीने सुचविलेल्या कल्पनेनुसार लॅमिनेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन प्लास्टिक शीट आणि डोक्याभोवती लावण्यासाठी फोमचा उपयोग करीत फे सशील्ड तयार केले. यामुळे तोंड पूर्ण झाकले जाते.

मास्क कसे?

किमान संसर्ग रोखू शकेल असे जाड आणि श्वास घेण्यासही सोयीस्कर असेल अशा फॅब्रिकचा वापर मास्क बनविण्यासाठी केला आहे. हे फॅब्रिक आनंदवनमधील पॉवरलूममध्ये काढलेले आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी, मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करत असून हे पूर्णपणे मोफत संस्थेकडून दिले जात आहेत.

मास्क ठेवण्यासाठी पाकीटही..

’मास्क वापरल्यानंतर तो बॅगेत किंवा असाच ठेवला तर त्यातून संसर्ग पसरण्याचा संभव असल्याने वापरलेले आणि न वापरलेले (निर्जतुक) मास्क ठेवण्यासाठी दोन स्वंतत्र कापडी पाकिटेही तयार केली आहेत.

’एका व्यक्तीने किमान सहा मास्क घेणे गरजेचे आहे. दर चार तासांनी मास्क बदलणे, घरीच प्रेशर कुकरच्या मदतीने मास्कचे निर्जतुकीकरण कसे करावे, याचीही माहिती दिली जात आहे.