05 March 2021

News Flash

सर्जनशील आविष्कारांचा ‘टेकफेस्ट’ सुरू

नावीन्यपूर्ण आणि अभिनव कल्पनाशक्तीचे आविष्कार असलेले प्रदर्शन पहिल्या दिवसातील उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ ची सुरूवात तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या व्याख्यानाने झाली.

आयआयटीच्या तंत्र महोत्सवात नवतंत्रज्ञानाचा जागर

माणसांशी संवाद साधणारे यंत्रमानव, पाण्यात बुडणाऱ्यांना वाचवणारे वाहन, जड वस्तू इच्छितस्थळी पोहोचवणारे यंत्र अशा आकर्षक आणि उपयुक्त नवतंत्रांनी भारलेल्या मुंबई आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’ या तंत्र महोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. नावीन्यपूर्ण आणि अभिनव कल्पनाशक्तीचे आविष्कार असलेले प्रदर्शन पहिल्या दिवसातील उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ हा एक प्रकारे नवतंत्रज्ञानाची जत्राच असतो. यंदा हिरकमहोत्सवी वर्षांनिमित्त तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या व्याख्यानाने या महोत्सवाला प्रारंभ झाला. प्राचीन भारतीय ज्ञानाचा वापर आधुनिक युगात कसा करता येईल, यावर लामा यांनी मार्गदर्शन केले.  ‘टेकफेस्ट’च्या निमित्ताने आयआयटीच्या संपूर्ण परिसराची सजावट करण्यात आली आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांबरोबरच विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि शिक्षक तसेच कंपन्यांचे प्रतिनिधीही या महोत्सवाला हजर होते.

संवाद साधणारे यंत्रमानव

स्वीडनवरून आणलेला ‘फुराट’ हा यंत्रमानव ‘नमस्कार, तुम्हाला भेटून आनंद झाला’ अशा प्रकारची वाक्ये बोलून समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत होता. लोकांना ‘नमस्ते’ करणारा भारतीय बनावटीचा यंत्रमानवही प्रदर्शनात होता. या यंत्रमानवात प्रोग्रॅमिंगच्या मदतीने हिंदी आणि इंग्रजी भाषा बोलण्याचे तंत्रही विकसित करण्यात आले आहे. याशिवाय अमेरिकेतून आलेला ‘मग्नी’ हा यंत्रमानव कोणतीही जड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केवळ तोंडी सूचनेनुसार नेऊन ठेवत होता. हे यंत्रमानव विद्यार्थ्यांचे आकर्षण केंद्र ठरत होते.

बुडणाऱ्यांना वाचवणारे वाहन

‘टेकफेस्ट’मध्ये भारतीय सैन्यदलाच्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शनही करण्यात येते. त्यातील पाण्यात बुडणाऱ्यांना वाचवणारे वाहन सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. याखेरीज रस्त्यावरील खड्डे शोधणारे ‘पॉटहोल मॅपर’ हे मोबाइल अ‍ॅप, हृदयाच्या ठोक्यांची नोंद जतन करून ठेवणारा ‘स्टेथोस्कोप’ ही उपयुक्त उपकरणेही चर्चेची ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 2:55 am

Web Title: creative seekers techfest continue
Next Stories
1 ‘मोनो’तून स्कोमी हद्दपार
2 मध्य रेल्वेवर उद्या सहा तासांचा मेगाब्लॉक
3 आरोपींच्या फायद्यासाठी तपासात विलंब?
Just Now!
X