महिन्याच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकीय पटलावर सत्तांतर झाले असताना सांस्कृतिक पटलावरही नवे नाटय़मन्वंतर साकारणार आहे. महाराष्ट्रातील तरुण नाटककार, दिग्दर्शक, कलाकार या सर्वाच्याच सर्जनशीलतेला आव्हान देणारी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा याच महिन्यात सुरू होत असून लवकरच या स्पर्धेचे अर्ज ‘लोकसत्ता’च्या संकेतस्थळावरून उपलब्ध होणार आहेत. ‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रायोजक म्हणून ‘झी मराठी’ काम करणार आहे.
राज्यभरातील नाटय़वेडय़ा महाविद्यालयीन तरुणांना एक नवे आणि हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यभरात आठ केंद्रांवर होणार आहे. यात मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अहमदनगर आणि रत्नागिरी या केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर प्राथमिक आणि केंद्रीय अंतिम अशा दोन फेऱ्या होतील. प्रत्येक केंद्राच्या अंतिम फेरीत पहिल्या आलेल्या एकांकिकांची महाअंतिम फेरी मुंबईत मोठय़ा जल्लोषात पार पडणार आहे. महाअंतिम फेरीत सवरेत्कृष्ट ठरलेली एकांकिका ही खऱ्या अर्थाने ‘लोकांकिका’ ठरेल.
या स्पर्धेत फक्त महाविद्यालये सहभागी होऊ शकतात. तसेच स्पर्धेसाठी लिहिलेल्या एकांकिकेचे प्रयोग याआधी कुठेही झालेले नसणे अपेक्षित आहे. त्यानुसार बहुतांश महाविद्यालयीन नाटकवेडय़ांची लेखणी कधीच पुढे सरसावली आहे. आता या स्पर्धेसाठीच्या अर्जाची प्रतीक्षाही लवकरच संपणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत होणाऱ्या या स्पर्धेमध्ये नाटकवेडय़ा विद्यार्थ्यांना परीक्षांचा किंवा इतर कोणताही अडथळा येणार नाही, याचीही काळजी घेण्यात आली आहे.