News Flash

बँकेतील स्वाइप यंत्राद्वारे क्रेडिट कार्ड घोटाळा

एका टोळीला अटक

एका टोळीला अटक

क्रेडिट कार्डचा तपशील चोरून बनावट क्रेडिट कार्ड बनवून त्याद्वारे एटीएम यंत्रातून पैसे काढून वा मोठय़ा प्रमाणावर खरेदी करून आतापर्यंत घोटाळा केला जात होता. परंतु बँकेतूनच स्वाइप यंत्र मिळवून त्याचा अमर्याद वापर करून क्रेडिट कार्ड घोटाळा केला जात असल्याची नवी पद्धती मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण विभागाने शोधून काढली आहे. या प्रकरणी अलीकडेच एका टोळीला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून अधिकृत बँकांची स्वाइप यंत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.

बँकेकडून स्वाइप  यंत्र मिळविण्यासाठी ही टोळी भाडय़ाने दुकान घेत असे. कुठल्यातरी वस्तूंची विक्री केली जाते, असे भासविले जात असे. बँकांकडून शहानिशा न करता स्वाइप यंत्र उपलब्ध करून दिले जात होते. या यंत्राचा वापर करून क्लोन केलेल्या क्रेडिट कार्डाचा वापर करून मोठय़ा प्रमाणात रक्कम काढली जात असे. याबाबत तक्रार झाली तर शहानिशा करणाऱ्या पोलिसांना नेमके कुठून पैसे काढले गेले हे कळत असले तरी तोपर्यंत संबंधित दुकान बंद केलेले आढळून येत असे. संबंधित टोळीने अन्य ठिकाणी पुन्हा असाच प्रकार सुरू केल्याचे आढळून येत होते. एका दुकानात अनेक बँकांनी स्वाइप यंत्रे उपलब्ध करून दिल्याचे चौकशीत आढळून आले आहे.

या घोटाळ्यात तीन प्रकारच्या टोळ्या कार्यरत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. बँकेचा प्रतिनिधी असल्याचे सांगून दूरध्वनीवरून कार्डाचा तपशील घेणे, त्यानंतर हा तपशील अन्य एका टोळीला विकणे आणि या टोळीकडून रिकाम्या क्रेडिट कार्डाद्वारे क्लोन कार्ड बनविणे आणि या कार्डाचा वापर करून मोठय़ा प्रमाणात खरेदी करणे वा पैसे काढणे आदी प्रकार आतापर्यंत केले जात होते.

परंतु आता बँकेकडूनच स्वाइप यंत्रे मिळवून क्लोन केलेल्या कार्डाचा वापर करून घोटाळा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बँकांनी स्वाइप यंत्रांचे वितरण करताना सावधानता बाळगण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 2:25 am

Web Title: credit card fraud
Next Stories
1 घरांचा ताबा देण्यासच बिल्डरांची टाळाटाळ
2 निर्विघ्न उत्सवासाठी सीसीटीव्हीचे कवच
3 लोकार्पणानंतरही कुल्र्याचे डिलक्स प्रसाधनगृह कुलूपबंद!
Just Now!
X