पिन क्रमांकही न जोडलेल्या कार्डद्वारे परस्पर व्यवहार

मुंबई : क्रेडिट कार्ड हाती पडते न पडते तोच ग्राहकाला ५० हजार रुपयांना फसवल्याचे प्रकरण सायबर पोलिसांकडे तपासासाठी आले आहे. विशेष म्हणजे हे कार्ड कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेल्या चार अंकी पिन क्रमांकाची निर्मितीही झालेली नसताना खातेधारकाला फसवण्यात आले आहे.

व्यवसायाने वकील असलेल्या तरुणीसोबत हा प्रकार घडला. नोव्हेंबर महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (एसबीआय) तीन लाख रुपयांचे ‘क्रेडिट लिमिट’ असलेल्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला होता. बँकेने २३ डिसेंबरला पाठवलेल्या कार्डची लिमिट एक लाख रुपयांच्या आत होती. तसेच या कार्डला पिन क्रमांक जोडलेला नव्हता. त्यामुळे तातडीने ग्राहक सेवा केंद्राकडे लिमिट कमी असल्याबद्दल तक्रार नोंदवली. ती नोंदवून घेण्यात आली, असे या तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. बँकेचा प्रतिनिधी संपर्क साधेल, असे ग्राहक सेवा केंद्रातून सांगण्यात आले.

२५ डिसेंबरला तक्रारदार तरुणीला एसबीआय क्रेडिट कार्ड ग्राहक सेवा केंद्राची प्रतिनिधी असे भासवून पूजा शर्मा नावाच्या महिलेने संपर्क साधला. या महिलेने तक्रारदार तरुणीचे नाव, पत्ता, काम करत असलेले ठिकाण, हुद्दा, तक्रारीचे कारण, इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्डचे तपशील आदी सर्व माहिती दिली. तसेच स्वत:च्या ओळखपत्रावरील कर्मचारी क्रमांक आणि तक्रार नोंदणी क्रमांकही सांगितला. एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधल्यानंतर तेथून ग्राहकाचा खाते क्रमांक किंवा अन्य तपशील भ्रमणध्वनीच्या ‘की पॅड’वर टाईप करण्यास सांगितला जातो. ही प्रक्रियाही पूजा नावाच्या महिलेने तक्रारदार तरुणीकडून करून घेतली आणि नेटवर्कमध्ये अडथळा येतो, असे सांगत संपर्क तोडला. त्यानंतर तक्रारदार तरुणीला तिच्या एसबीआय आणि इंडसइंड क्रेडिट कार्डवरून ५० हजार रुपये वळते झाल्याबाबतचे लघुसंदेश प्राप्त झाले.

एसबीआयला क्रेडिट कार्डसाठी केलेल्या अर्जात जे तपशील होते तितकेच तपशील पूजा नावाच्या महिलेने सांगितले, असा दावा तक्रारदार तरुणीने तक्रारीत केला. माझ्याकडे सारस्वत बँकेचेही क्रेडिट कार्ड आहे. मात्र एसबीआय बँकेकडे केलेल्या अर्जात फक्त इंडसइंडच्या क्रेडिट कार्डचा उल्लेख केला होता. पूजा नावाच्या महिलेने त्याचेच तपशील दिले. सारस्वत बँकेच्या कार्डबाबत उल्लेख केला नाही, असे तक्रारदार तरुणीने ‘लोकसत्ता’ला सांगितले. तरुणीने पोलीस तक्रारीसोबत एसीबीआय, इंडसइंड आणि मोबीक्वीककडे पैसे परत मिळावेत किंवा क्रेडिट लिमिट पूर्ववत व्हावी यासाठी पाठपुरवठा सुरू केला आहे.

याबाबत एसबीआयचे विभागीय अधिकारी प्रसूनजीत धर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले प्रतिनिधी पुन्हा संपर्क साधतील, असे सांगितले. मात्र एसीबीआयच्या प्रतिनिधीकडून संपर्क साधण्यात आला नाही.