पर्यावरण बदलांमुळे किनारी क्षेत्रांवर दुष्परिणाम; ३० वर्षांच्या अभ्यासातून बाब उघड

मुंबई : गाळाने भरलेले नद्यांचे मुख आणि संथ झालेला जलप्रवाह यांमुळे मुंबई महानगर परिसरातील नाले आणि खाड्या आक्रसल्या आहेत. गेल्या ३० वर्षांत सागर किनारा परिसंस्थेत होत असलेल्या वेगवान बदलामुळे मुंबई महानगर परिसरातील एकूण १०७.६ चौ किमी एवढे नदी, नाले आणि शेत जमीन युक्त असलेले क्षेत्र लुप्त झाले आहे. या क्षेत्राचे परिवर्तन दलदलीत झाले असून खारफुटी वाढल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवरील १५ ते २० ठिकाणांची माहिती उपग्रहांद्वारे मिळवून त्याचा माहितीसंच तयार करण्याचे काम ‘सृष्टी कन्झव्र्हेशन फाऊंडेशन’ करीत आहे. सखल भागात खारे पाणी शिरल्याने भात खाचरांमध्ये खारफु टी वनस्पती वाढीस लागल्या आहेत. उरणमधील कारंजा भागात ६०.६ चौरस किमी कृषी क्षेत्रात खारे पाणी शिरल्याने ४.५ पटीने कांदळवनाची वाढ झाली आहे. तसेच मुंबई-ठाणे खाडीचे ४७ चौरस किमी जलक्षेत्र गाळयुक्त दलदल आणि खारफु टीने व्यापले आहे. ३० वर्षांपूर्वी म्हणजेच १९९० साली असलेले ४०० चौरस किमी जलक्षेत्र २०१९ पर्यंत ३५० चौरस किमीपेक्षा कमी झाले आहे.  मुंबई-ठाणे खाडीच्या जमिनीवर अंदाजे ४७ चौरस कि.मी. नदी-नाल्यांचे क्षेत्र हे दलदलीत रुपांतरीत झाले आहे. याच प्रकारे ठाणे खाडीमध्ये २४ चौ. कि.मी. चे क्षेत्र निर्माण झाले आहे. सतत वाढत असलेल्या समुद्र पातळीचा हा परिणाम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

धोका काय?

नाले आणि खाड्या जर गाळाने भरल्या तर त्या उथळ होतात. यामुळे खाडीची पाणी वाहण्याची क्षमता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. परिणामत: मोठ्या प्रमाणात पाऊस असताना आणि त्याचवेळी भरती आल्यास समुद्राचे पाणी शहरामध्ये सर्व भागांत पसरू शकते.

शेतीवर परिणाम…

कृषी जमीन आणि त्यावर उपजीविका असणाऱ्यांवर वाढत्या खार जमिनीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे. किनारपट्टीच्या प्रदेशात, खाडीच्या किनाऱ्यालगतच्या किंवा समुद्राजवळील बहुतेक शेतजमिनी  हळूहळू क्षारयुक्त होत चाललेल्या आहेत. त्यामुळे कृषीउत्पन्न घटत आहे. त्याचप्रमाणे मासेमारीवरही त्याचा परिणाम होत असल्याचे निरीक्षण या अभ्यासात नोंदवण्यात आले आहे.

योग्य उपाय योजले नाहीत तर खाडीचे संपूर्ण क्षेत्र काही काळानंतर कांदळवनांमध्ये, अत्यंत उथळ दलदलींमध्ये किंवा बऱ्याच भागातील कोरड्या जमिनीमध्ये रुपांतरित होतील. हे क्षेत्र जलवाहतुकीसाठी अयोग्य होईल. तसेच यामुळे वादळादरम्यान वाढणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता देखील कमी होईल. त्यामुळे किनारपट्टीचा प्रदेश किं वा खाडी किनाऱ्याच्या प्रदेशातील धोका वाढेल – डॉ. दीपक आपटे, कार्यकारी संचालक सृष्टी कॉन्झर्वेशन फाउंडेशन.