News Flash

गुलाबी चेंडूचा अडथळा कसा पार करणार?

विख्यात क्रिकेट विश्लेषक मकरंद वायंगणकरांशी माहितीरंजक वेबसंवाद

(संग्रहित छायाचित्र)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध बहुचर्चित कसोटी मालिकेला येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिली कसोटी दिवसरात्र असून या सामन्यात गुलाबी चेंडू खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाने आजवर दिवसरात्र कसोटी क्रिकेटवर वर्चस्व गाजवलेले असले, तरी भारताकडेही चार तेज गोलंदाज आहेत. ते यजमानांना आव्हान देतील का? ऑस्ट्रेलियन तोफखान्याला कोहली-पुजारा-रहाणे समर्थपणे तोंड देतील का?.. या व अशा अनेक पैलूंची सखोल चिरफाड करण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत, विख्यात क्रिकेट विश्लेषक आणि मार्गदर्शक डॉ. मकरंद वायंगणकर.

‘लोकसत्ता विश्लेषण’ या उपक्रमाअंतर्गत हा वेबसंवाद १६ डिसेंबर म्हणजे येत्या बुधवारी दुपारी ४ वाजता होत आहे.

गुलाबी चेंडू आणि पारंपरिक तांबडा चेंडू यांच्यात नेमका फरक काय? गुलाबी चेंडू संधिप्रकाशात अधिक धोकादायक का ठरतो, ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज मायकेल स्टार्क आजवर या प्रकारात सर्वाधिक यशस्वी का ठरत आला आहे, अशा अनेक मुद्दय़ांवर डॉ. वायंगणकर प्रकाश टाकणार आहेत. पहिली कसोटी जिंकण्यासाठी भारताला काय करावे लागेल, यावर ऊहापोह होईल. वाचकांच्या अनेक शंकांचे निरसन या वेबसंवादात केले जाईल. अनेक अज्ञात आणि तांत्रिक बाबींवर सखोल चर्चा होईल.

डॉ. मकरंद वायंगणकर म्हणजे मुंबई आणि भारतीय क्रिकेटचा ज्ञानकोशच. जवळपास पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी विविध इंग्रजी नियतकालिकांसाठी क्रिकेट पत्रकारिता केली. मराठीतही त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. डॉ. वायंगणकर हे उत्तम मार्गदर्शक म्हणूनही क्रिकेट जगताला सुपरिचित आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे सल्लागार, बडोदे क्रिकेट संघटनेचे मुख्याधिकारी या पदांवर त्यांनी काम पाहिले. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या जडणघडणीत त्यांचा सहभाग होता. छोटय़ा शहरांमधून गुणवान क्रिकेटपटू हेरण्याची संकल्पना त्यांनी मांडली आणि बीसीसीआयच्या मदतीने यशस्वीरीत्या राबवली. महेंद्रसिंग धोनीसारखे क्रिकेटपटू हे याच योजनेचे फलित. मुंबईतील क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटमधील मुंबई हा त्यांच्या विलक्षण जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय. या विषयात त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. क्रिकेटच्या शास्त्रशुद्ध विश्लेषणामुळेच इयन चॅपेल, जेफ थॉमसन, ग्रेग चॅपेल, रिकी पाँटिंग असे मातबर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू त्यांच्याशी आवर्जून संपर्क साधतात.

सहभागासाठी.. https://tiny.cc/LS_Vishleshan_16Dec  येथे नोंदणी आवश्यक.

कार्यक्रम कधी? :  वेबसंवाद १६ डिसेंबर, बुधवारी दुपारी ४ वाजता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:01 am

Web Title: cricket analyst makrand waingankar in loksatta vishleshan abn 97
Next Stories
1 आरक्षित उमेदवारांना जातप्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र बंधनकारक
2 तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
3 ऋतिक रोशनची तक्रार मुंबई पोलिसांनी केली ट्रान्सफर, कंगना भडकली आणि म्हणाली…
Just Now!
X