पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत मुंबईतील CCI अर्थात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने इम्रान खानचे पोस्टर झाकले आहे. आम्हाला इम्रान खानच्या क्रिकेटमधल्या कारकिर्दीबाबत आदर आहे. मात्र सध्या इम्रान खान पाकिस्तानचा पंतप्रधान आहे. आमच्या जवान सीमेवर शहीद झाले असताना आम्ही त्याचे पोस्टर गौरव म्हणून ठेवू शकत नाही. त्यामुळे आम्ही हे पोस्टर झाकण्याचा निर्णय घेतल्याचे सीसीआयने स्पष्ट केलं. सीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात इम्रान खान यांचे चित्र लावण्यात आले होते. ते आता झाकण्यात आले आहे.

पुलवामा या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होतो आहे. पाकिस्तानच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला. या हल्ल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होतो आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या अश्रूचा बदला घेतला जाईल असे म्हटले आहे. तर मुंबईत अनेक ठिकाणी दुकानं बंद करून या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. आता सीसीआयने क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान याचे पोस्टर झाकले आहे. त्याच्या क्रिकेटबद्दल आम्हाला आदर असला तरीही त्याच्या देशाने जे भ्याड कृत्य केले ते आम्ही सहन करणार नाही म्हणून त्याचे पोस्टर झाकत आहोत असे सीसीआयने जाहीर केले आहे.