News Flash

दिव्यांगही करणार क्रिकेटच्या मैदानात चौफेर फटकेबाजी

येत्या 30 मार्चपासून आंतरविभागीय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

दिव्यांगही करणार क्रिकेटच्या मैदानात चौफेर फटकेबाजी

एक पाय नसलेल्या फलंदाजाला बॅटच्या आधारे उभे राहून चौकार ठोकताना पाहायचेय…!  एक हात नसूनही अचूक माऱयावर फलंदाजाची यष्टी वाकवणाऱ्या गोलंदाजाशी संवाद साधायचाय…!! धड उभंही राहता येत नसले तरी मैदानात चेंडू अडविण्यासाठी धडपडणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीला सलाम ठोकायचाय…!!! तर तुम्हाला येत्या 30 मार्चपासून मरीन लाईन्सच्या पोलीस जिमखान्यावर सुरू होत असलेल्या आठव्या आंतरविभागीय एलआयसी करंडक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला भेट द्यावीच लागेल. पाच विभागीय संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेत मुंबईकरांना देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या दिव्यांग क्रिकेटपटूंसह भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचीही चौफेर फटकेबाजी अनुभवायला मिळणार आहे.

प्रबळ इच्छाशक्ती असली की इच्छा पूर्ण करायला आपोआप शक्ती मिळते. शरीराने दुबळे असूनही क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडण्याचे ध्येय गाठणाऱ्या दिव्यांग क्रिकेटपटूंचा अंगावर शहारे आणणारा खेळ पाहण्याची संधी मुंबईकर क्रीडाप्रेमींना लाभणार आहे.  त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी कसोटीपटू अजित वाडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. क्रिकेट खेळण्याचा अधिकार दिव्यांगानाही आहे आणि तो त्यांना आम्ही मिळवून देत असल्याचे एलआयसी करंडक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेच्या पत्रकार परिषदेदरम्यान अजित वाडेकर म्हणाले. त्यासाठीच आठव्या आंतरविभागीय दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. गेल्या वर्षभरात पाच विभागांमध्ये झालेल्या स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱया खेळाडूंना घेऊन पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य विभाग असे पाच विभागीय संघ बनविण्यात आल्याची माहिती वाडेकर यांनी याप्रसंगी दिली.

या स्पर्धेत 40 टक्के दिव्यंगत्व असलेले खेळाडूच खेळू शकतात. या स्पर्धेचे बहुतांश नियम हे क्रिकेटचेच असले तरी एका डावात दोन धावपटू (रनर) घेण्याचा नियम आहे. अनेक खेळाडू एका पायाने दिव्यांग असल्यामुळे फलंदाजी करताना रनर घेण्याची त्यांना वारंवार गरज भासते. या स्पर्धेच्या निमित्ताने भारताच्या तब्बल 28 राज्यांमधून दिव्यांग क्रिकेटपटू मुंबईत येणार असून प्रत्येकाची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याचीही माहिती वाडेकरांनी दिली. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणारे दिनेश सैन, दशरथ जामखंडी, सौरभ रवालिया, प्रणव राजळे आणि बलविंदर सिंगसारखे खेळाडूही खेळताना दिसतील.

या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा जीआयसी रे च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीमती एलिस वैद्यन, माजी कसोटीपटू करसन घावरी आणि उमेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याचीही माहिती वाडेकर यांनी दिली.

एक यशस्वी खेळाडू म्हणून या दिव्यांग खेळाडूंची कारकीर्द  घडावी. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा. स्वप्न पाहण्याचे धाडस त्यांच्या डोळ्यांत दिसावे आणि जगात अशक्य असे काहीच नाही, याची जाणीव त्यांना व्हावी म्हणून आमचाही हा धाडसी प्रयत्न आहे आणि आम्हाला यात नक्कीच यश मिळेल, असा दृढ विश्वासही अजित वाडेकर यांनी बोलून दाखविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2018 2:22 pm

Web Title: cricket tournament organised for handicap players
Next Stories
1 आयपीएलसाठी धोनीचा कसून सराव, लगावले जोरदार फटके
2 तो मी नव्हेच ! आक्षेपार्ह ट्विटवर हार्दिक पंड्याचं स्पष्टीकरण
3 राष्ट्रीय टेबल टेनिसपटू सौम्यजित घोषवर बलात्काराचा आरोप
Just Now!
X