शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे क्रिकेटशी वेगळेच नाते होते. क्रिकेटमध्ये बाळासाहेब ठाकरेंना विशेष रस होता. बाळासाहेबांचे मुंबईतील क्रिकेटपटूंशी निकटचे संबंध होते. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि विक्रमवीर सुनील गावसकर यांनी बाळासाहेबांविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे. बाळासाहेबांनी मला ‘मामाचे भाचे’ असे नाव दिल्याचे गावसकर यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील चित्रपट २५ जानेवारीस प्रदर्शित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘ठाकरे यांना मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात गावसकर बोलत होते. भारतीय संघातील जुन्या काळातील क्रिकेटपटू माधव मंत्री हे सुनील गावसकर यांचे मामा होते. माधव मंत्री आणि बाळासाहेब ठाकरे हे जवळचे मित्र. बाळासाहेब ठाकरे त्याकाळी मुंबईच्या लोकलमधून प्रवास करत असत. गावसकर यांची त्यावेळी मुंबईच्या रणजी संघातही निवड झाली नव्हती. एकदा ८.३२ च्या लोकलमध्ये गावसकर आणि माधव मंत्री प्रवास करत असताना त्यांची बाळासाहेबांशी भेट झाली. त्यावेळी माधव मंत्री यांनी गावसकर यांची बाळासाहेबांशी ओळख करून दिली. हा माझा भाचा आहे. चांगला क्रिकेट खेळतो, असे मंत्री यांनी बाळासाहेबांना सांगितले. ओ.. मामाचे भाचे.. अशा आपल्या चिरपरिचित शैलीत बाळासाहेबांनी गावसकरांना उद्देशून म्हटले. बाळासाहेबांनी मोठ्या आवाजात ओ..मामाचे भाचे असे म्हटले होते. लोकलमध्ये त्यावेळी गर्दी होती. त्यांच्या मागे बसलेल्यांपैकी कोणीतरी ते ऐकले.

त्यानंतर ज्यावेळी सामना खेळताना सीमारेषेवर चेंडू आणायला जायचो. त्यावेळी प्रेक्षकांतून कोणीतरी सारखे मला ओ..मामाचे भाचे..अशी हाक द्यायचे, असे गावसकर यांनी सांगितले. लोकलमध्ये मागे बसलेल्यापैकीच तो कोणीतरी असेल हे सांगताना बाळासाहेबांनी मला ‘मामाचे भाचे’ असे नाव दिल्याचे गावसकर म्हणाले.

गावसकर यांनी १९७४ साली मुंबई येथे झालेल्या भारत-वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्याचीही आठवण सांगितली. बाळासाहेब त्यावेळी सामना पाहायला आले होते. या सामन्यात क्लाईव्ह लॉईडने भारताविरोधात द्विशतक ठोकले होते. एक प्रेक्षक अचानक मैदानात घुसला आणि त्याने लॉईडला हार घातला. पोलिसांनी त्या व्यक्तीला अक्षरश: बदडून काढत मैदानाबाहेर नेले. लोक संतापले होते. प्रचंड गोधळ सुरू झाला होता. सामन्यात व्यत्यय आला होता. बाळासाहेबांनी लगेचच प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या अपिलानंतर संपूर्ण स्टेडियम शांत झाले.

फॉर्ममध्ये नसताना बाळासाहेबांनी नेहमी पाठिंबा दिला. आम्ही त्यांच्याबरोबर गप्पा ही मारत असत. त्यावेळी ते क्रिकेटमधील किस्से जाणून घेण्यात उत्सुक असत. भारतीय क्रिकेट संघटनेत सक्रिय होण्याचा ते नेहमी मला सल्ला देत. तुम्ही खेळाडुंनीच क्रिकेट संघटना चालवल्या पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असत. त्यात स्वारस्य नसल्याचे मी त्यांना सांगत. आपल्याच सहकारी खेळाडुंविरोधात निवडणूक लढवणे योग्य नाही असे मी त्यांना सांगत. मी काही काळ बीसीसीआयचा प्रमुख होतो. दुर्दैवाने ते पाहण्यासाठी बाळासाहेब हयात नव्हते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.