टाळेबंदीचे उल्लंघन करून वांद्रे जिमखान्याचा वर्धापन दिन साजरा केल्याप्रकरणी जिमखाना अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जय हो फाउंडेशनचे आदिल फिरोज खत्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. त्यानुसार सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. ४ एप्रिल रोजी या आदेशाचे उल्लंघन करून वांद्रे जिमखान्याचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमात १५ हून अधिक सभासद मुखपट्टय़ा न लावता सहभागी झाले होते.

जिमखान्याने याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केली होती. त्याचा आधार घेत खत्री यांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी जिमखान्याच्या अध्यक्षा डॉ. शेरील मिस्किटा यांच्यासह १५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.