मुंबई : बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरोधात मरिन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, हे जुने प्रकरण पुन्हा उकरून काढले असल्याची चर्चा आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे आणि संजय पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांधकाम व्यावसायिक शाम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

‘माझ्या भावावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. मात्र  या गोष्टीला  राजकीय रंग दिला जात आहे, असे शिवसेना आमदार गीता जैन यांनी स्पष्ट केले. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यातून सुटका करण्याकरिता परमबीर यांच्याशी जुळवून घेण्यासाठी १५ कोटींची मागणी करण्यात आली होती. मी काही पैसे दिले असून त्याची माहिती पोलिसांना दिली आहे, असे तक्रारदार शाम सुंदर अग्रवाल यांनी सांगितले.