घरातला पाळीव प्राणी आक्रमक असेल, परिसरातील अन्य प्राण्यांवर किंवा व्यक्तींवर हल्ला करत असेल तर मालकाने वेळीच त्या प्राण्याला आवरणे आवश्यक आहे. या प्राण्याच्या हल्ल्यात अन्य प्राणी किंवा व्यक्ती जखमी झाल्यास मालकाविरोधात गुन्हा नोंद करण्याची तरतूद आहे. अलीकडेच कफ परेड पोलिसांनी आक्रमक पाळीव प्राण्याच्या मालकाविरोधात भारतीय दंड विधानातील कलम २८९ अन्वये गुन्हा नोंदवला, चौकशी आणि तपासही सुरू केला.

२३ मार्च रोजी कफ परेडच्या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या आणि पेशाने बँक अधिकारी असलेल्या तरुण बाली यांच्या अल्सेशीयन प्रजातीच्या श्वानाने (लेक्झी) ज्येष्ठ विधिज्ञ आस्पी चिनॉय यांच्या शेटलॅण्ड शीपडॉग प्रजातीच्या श्वानावर (सॅसी) हल्ला केला. या हल्ल्यात ९ वर्षांची सॅसी गंभीररीत्या जखमी झाली. दोन आठवडय़ांच्या उपचारांनंतर सॅसीचा मृत्यू ओढवला. त्यानंतर अ‍ॅड. चिनॉय यांनी कफ परेड पोलीस ठाणे गाठून बाली यांच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीनुसार पोलिसांनी बाली यांच्याविरोधात २८९ कलमान्वये गुन्हा नोंदवला.

कफ परेड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक रश्मी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्याकडील पाळीव प्राणी आक्रमक आहे, त्याच्या हल्ल्यामुळे एखादा जखमी होऊ शकतो किंवा त्याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असूनही खबरदारीची उपाययोजना न केल्याबद्दल बाली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. तपासासाठी इमारतीतील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले आहे. तसेच घटनेच्या प्रत्यक्षदर्शीसह इमारतीतील अन्य रहिवाशांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंतच्या चौकशीत इमारतीतील रहिवाशांनी आक्रमक लॅक्झीला आवरण्यासाठी तोंडावर मास्क बांधण्यासह अन्य उपाययोजना करण्याची विनंती बाली यांच्याकडे केली होती, अशी माहिती मिळते.

‘सॅसीच्या मृत्यूचा चटका आहेच. पण त्याहून महत्त्वाची बाब ही की लॅक्झीने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात माझ्या अन्य श्वानावरही हल्ला केला होता. लॅक्झी आक्रमक असून त्याच्यापासून इमारतीतील अन्य पाळीव प्राणी, लहान मुले, रहिवाशांना धोका आहे, अशी समज बाली यांना देण्यात आली होती. सॅसीवर हल्ला घडला तेव्हा लॅक्झीने इमारतीच्या लिफ्टमनचाही चावा घेतला होता,’ असे चिनॉय यांनी सांगितले.

चिनॉय २१व्या तर बाली चौथ्या मजल्यावर राहतात. बाली यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार २३ मार्चला लॅक्झीचा नेहमीचा देखभालदार अनुपस्थित होता. त्यामुळे नवख्या तरुणावर लॅक्झीला सांभाळण्याची जबाबदारी होती. त्या दिवशी लिफ्टनजरचुकीने २१व्या मजल्यावर गेली.दार उघडताच लॅक्झी, सॅसी समोरासमोर आले. दोघे देखभालदाराच्या हातून निसटले आणि एकमेकांना भिडले. सॅसीचा मृत्यू झाला त्याचे दु:ख आम्हालाही आहे. मात्र लॅक्झीला घरातून बाहेर काढण्याची शिक्षा अमानवीय असेल, असे बाली यांनी माध्यमांकडे स्पष्ट केले.