चेंबूरमध्ये जिमखाना व्यवस्थापक,जेवण पुरवठादार अटकेत

मुंबई : करोनाचा प्रसार रोखण्यासाठी विवाह सोहळ्यात आखून दिलेली संख्येची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी चेंबूरमध्ये चार जणांविरोधात टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. छेडानगर जिमखान्याचे सचिव, व्यवस्थापक, जेवण पुरवठादार यांच्यासह वधूच्या भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटकही करण्यात आली आहे.

विवाह सोहळ्यात केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही चेंबूरमधील छेडानगर जिमखान्यामध्ये रविवारी आयोजित एका लग्न समारंभात ३५० हून अधिक व्यक्ती सहभागी झाले होते.

याबाबत माहिती मिळताच पालिकेच्या एम-पश्चिाम विभागाचे साहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण आणि आरोग्य अधिकारी भूपेंद्र पाटील यांनी जिमखान्यात धाव घेऊन पाहणी केली व टिळक नगर पोलीस ठाण्यात जिमखान्याचे सचिव सी. डी. बिस्त, व्यवस्थापक रजनीकांत कदम, जेवणाचा पुरवठा करणारे अशोक रोहित आणि वधूचा भाऊ सनी साबळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कदम आणि रोहित यांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली.

पबच्या व्यवस्थापकावर गुन्हा

  • करोना नियमांचे उल्लंघन करून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अंधेरीतील ‘अमेथिस्ट पब’वर पालिकेच्या के पश्चिम विभागाने रविवारी मध्यरात्री कारवाई केली. याप्रकरणी पबच्या व्यवस्थापकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुशांत जाबरे असे त्याचे नाव आहे. तर मुखपट्टी परिधान न केलेल्या २५ ग्राहकांना पालिकेने दंड ठोठावला आहे.
  • अंधेरी पश्चिमेला विरा इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात रात्री १ वाजल्यानंतर उशिरापर्यंत पब सुरू असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी पबमध्ये ५० टक्क्यांहून अधिक ग्राहक आढळून आले. पबमध्ये अंतर नियमाचे पालन होत नसल्याचे, तसेच ग्राहकांनी आणि कर्मचाºयांनी मुखपट्टी परिधान केली नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यानुसार पथकाने याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पब व्यवस्थापकाच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, सरकारी आदेशाचे उल्लंघन आणि संसर्गजन्य रोग पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.