मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलला आग लागून ११ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मॉलमधील रुग्णालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली नसल्याने हा अपघात घडून ११ जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. ड्रीम मॉलचे संचालक आणि सनराईज हॉस्पिटलच्या संचालकांविरोधात पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास ड्रीम मॉलच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. यावेळी मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर सनराईज हे कोविड रुग्णालय सुरू होते. त्यामध्ये सुमारे ७८ रुग्णांवर उपचार सुरू होते. आगीची माहिती मिळताच काही रुग्ण स्वत:हून बाहेर पडले. तर काही रुग्णांना अग्निशमन दलाच्या जवानांनी एअर लिफ्ट करून सुखरूप काढले. मात्र आगीचे आणि धुराचे लोळ तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचल्याने १० रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला. तर अन्य एका रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये ९ पुरुष आणि २ महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू पावलेले बहुतांश व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहेत. प्राथमिक चौकशीत रुग्णालय आणि मॉल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांना प्राण गमवावे लागल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. त्यामुळे पोलिसांनी मॉलचे संचालक राकेशकुमार कुलदिपसिंग वाधवान, त्याची मुलगी निकीता अमितसिंग त्रेहान, मुलगा सारंग राकेश वाधवान, तसेच दीपक शिर्के आणि प्रिव्हिलेज हेल्थकेअर सव्र्हिसेस प्रा. लि. कंपनी व सनराईज रुग्णालयाचे संचालक अमितसिंग त्रेहान आणि स्वीटी जैन यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यातील निकीता त्रेहान या सनराईज रुग्णालयाच्याही मालक आहेत.

मॉलला पालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले गेले नसताना १ ऑक्टोबर २०२० ला सनराईज हॉस्पिटलला नर्सिंग होम चालविण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच गाळेधारक आणि संचालक मंडळातील वादामुळे एनसीएलटीने मॉलवरती प्रशासकाची नेमणूक केली होती. अ‍ॅड. राहुल सहस्त्रबुद्धे हे २०१८ पासून प्रशासक आहेत. मात्र ड्रीम्स मॉल आणि सनराईज रुग्णालयाचे संचालक, प्रशासक आणि प्रशासकीय अधिकारी यांनी रुग्णालयातील परवान्यामधील अटी शर्तीचे पालन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे आणि अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही याबाबत वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक होते. मात्र याबाबत खबरदारी बाळगली नसल्याने ही आग लागून दुर्घटना घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.