कोणतीही शहानिशा न करता खोटी ध्वनी-चित्रफित समाजमाध्यमांवर पसरवून मुंबई महापालिकेची बदनामी करणारा मजकूर लिहिल्याबद्दल एकाविरोधात भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिवंत माणसाला स्मशानभूमीत नेले जात असल्याची ध्वनी-चित्रफित प्रसारित करून मुंबई महापालिकेच्या हद्दीत हा प्रकार घडला असल्याचे या व्यक्तीने समाजमाध्यमांवर लिहिले होते. मात्र असा कोणताही प्रकार मुंबईत घडला नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत आढळल्यानंतर संबंधित व्यक्तीविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुरेश नाखुआ असे समाजमाध्यमांवर मजकूर लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने २० एप्रिल रोजी ट्विटरवर एक ध्वनी-चित्रफित टाकली होती. त्यावर ‘पालिका एका जिवंत माणसाला स्मशानभूमीत घेऊन जात आहे. स्मशानभूमीतही मोठे महावसुली टार्गेट आहे का?’, असा मजकूर त्याने इंग्रजी भाषेत लिहिला होता. ही पोस्ट पाहताच पालिके च्या ‘माय बीएमसी’ या ट्विटर हॅण्डलवरून या घटनेचे स्थळ विचारण्यात आले. वारंवार विचारणा करूनही नाखुआ यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

याचदरम्यान पालिकेने विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीत असा काही प्रकार घडला होता का याबाबत विचारणा केली. तसेच खातरजमा करून अहवाल सादर करण्यात सांगितले.

त्यानुसार मुंबईत कुठेही हा प्रकार घडला नसल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे पालिके च्या सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नाखुआ यांना व्हॉटसअ‍ॅपवर याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. ‘मी आता नातेवाईकांसाठी औषधे घ्यायला आलो आहे नंतर सांगतो, तुमच्या वरिष्ठांना सांगतो’, अशी उत्तरे तो देऊ लागला.

या प्रकारामुळे आरोग्य विभागाने नाखुआ यांच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकारानंतर नाखुआ यांनी ती ध्वनी-चित्रफित समाजमाध्यमावरून हटवली असून जाहीर माफीही मागितली आहे.