पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्याविरोधात समाजमाध्यमांवरून बदनामीकारक मजकूर पसरविल्याप्रकरणी व्यावसायिक रवी सुब्रमण्यम आणि अनिकेत पाटील या दोघांविरोधात जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवला. यापैकी पाटील याला अटक करण्यात आली, तर रवी याची चौकशी सुरू असल्याचे जुहू पोलिसांनी सांगितले.

मोदी यांनी अलीकडे केलेले परदेश दौरे, केंद्र-राज्य सरकारने घेतलेले निर्णय, भूमिका याबाबत रवी, पाटील यांनी सातत्याने फेसबुक, ट्विटर अशा समाजमाध्यमांवरून आपली मते मांडली. मात्र त्यातून मोदी, फडणवीस यांची हेतूपुरस्सर बदनामी करण्यात आली, अशी तक्रार भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाच्या प्रीती गांधी यांनी जुहू पोलिसांकडे केली. गांधी यांनी आरोपींनी वेळोवेळी समाजमाध्यमांवरून मांडलेली मते, केलेले भाष्याची छायाचित्रे (स्नॅपशॉट) पुरावे म्हणून तक्रारीसोबत जोडली.

गांधी यांच्या तक्रारीची शहानिशा करून रवी, पाटील यांच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा, भारतीय दंड विधानातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यात जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल ५०६ (भाग दोन) या कलमाचाही समावेश आहे. याप्रकरणी गोरेगाव येथील पेशाने व्यावसायिक असलेल्या अनिकेत पाटील याला अटक करण्यात आली, तर रवी याची सोमवारी चौकशी केली गेली. तसेच अधिक चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे, अशी माहिती जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.