मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून त्याचे मुंडण करणाऱ्या शिवसेना शाखाप्रमुख आणि त्याच्या साथीदारांविरोधात वडाळा टीटी पोलिसांनी बुधवारी गुन्हा नोंदवला.

हिरामणी तिवारी या व्यक्तीने २२ डिसेंबरला आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकला होता. हा प्रकार लक्षात येताच शाखाप्रमुख समाधान जुगदर, प्रकाश हसबे यांनी तिवारी यांना धमकावले. त्यानंतर शांतीनगर परिसरात बोलावून मारहाण केली आणि त्यांचे मुंडण केले. हा प्रकार सुरू असतानाच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी तिवारी यांच्यासह सेना शाखाप्रमुखाना, कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणले. तेथे पोलिसांनी दोघांची समजूत काढली.

प्रकरण निवळले असे वाटत असतानाच तिवारी यांचे मुंडण करतानाची ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर टाकण्यात आली. त्यामुळे तिवारी यांनी पुन्हा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तेव्हा शिवसैनिकांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. मात्र या प्रकरणात दखलपात्र गुन्हा नोंदवावा, आरोपींना अटक  करावी या मागणीसाठी  माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार तामिळ सेलवन यांनी बुधवारी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.