मालवणी येथील दारूकांडासाठी मिथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या किशोर पटेल याच्या अटकेनंतर आणखी दोघा पुरवठादारांच्या मागावर गुन्हे अन्वेषण विभागाच्या कांदिवली युनिटचे अधिकारी आहेत. नटू पटेल आणि गुरू पटेल अशी या दोन पुरवठादारांची नावे पुढे आली आहेत. याशिवाय मद्यकारखान्यातून पहिल्या प्रतीची मद्यनिर्मिती झाल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतीच्या मद्यात ब्युटोनॉल न मिसळता ते मद्य बाहेर जाऊ देणाऱ्या गुजरातमधील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग तपासला जाणार आहे.
मालवणी दारूकांडात मिथेनॉलमुळे १०४ जणांचे मृत्यू झाले. पाणीमिश्रित मिथेनॉलऐवजी पुरवठादारांकडून आलेले संहत मिथेनॉल दारूत मिसळले गेल्याने अनेकांचे प्राण गेले, मात्र या घटनेमुळे पाणीमिश्रित मिथेनॉलच हातभट्टीची दारू म्हणून दिले जात होते, हे स्पष्ट झाल्याकडे उत्पादन शुल्क विभागातील एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले. दमण, वापी येथे मद्यकारखाने असून या कारखान्यांत पहिल्या प्रतीच्या दारूची निर्मिती केल्यानंतर निर्माण झालेल्या दुसऱ्या व तिसऱ्या प्रतीच्या मद्यामध्ये ब्युटॉनेल मिसळावे लागते. त्यामुळे या मद्याची चव खूपच कडवड होते आणि ती पिण्यायोग्य होत नाही. परंतु गुजरातमधील उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी एक लिटरमागे १०० रुपये घेऊन हे मद्य ब्युटॉनेल न मिसळताच जाऊ देत होते. हीच बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरली जाते. याशिवाय त्यात मिथेनॉल मिसळून ती हातभट्टी म्हणूनही पुरविली जाते. गुजरातमधील साखर कारखान्यांतून मिथेनॉलची मोठय़ा प्रमाणात निर्मिती होते. या मिथेनॉलचा वापर शाई वा अन्य रसायने बनविण्यासाठी करण्यात येतो, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.