आरे पोलिसांचा तपास दिशाभूल करणारा असल्याचा कुटुंबाचा आरोप

आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक नरेंद्र शिंदे यांचा मुलगा अथर्व याच्या गूढ मृत्यूप्रकरणाचा योग्यरीतीने तपास करण्यात आरे पोलीस टाळाटाळ करत असून संशयित आरोपींना वाचवण्यासाठी अथर्वचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवले जात असल्याचा आरोप करत शिंदे कुटुंबीयांनी राज्याचे पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. शिंदे कुटुंबीयांच्या मागणीनुसार या मृत्यूप्रकरणाचा तपास गुन्हेशाखेकडे सोपवण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे सहआयुक्त संजय सक्सेना यांनी या घडामोडीस दुजोरा दिला. पोलीसपुत्राच्या मृत्यूच्या तपासाप्रकरणीच पोलिसांवर असा आरोप झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

कांदिवलीच्या ठाकूर संकुलात राहणारा अथर्व ७ मे रोजी सायंकाळी आरे कॉलनीतील रॉयल पाम्स परिसरातील एका बंगल्यात आयोजित वाढदिवसाच्या पार्टीला गेला होता. कृतिका राणे या तरुणीने आपल्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित केली होती, असे शिंदे कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. या पार्टीला अथर्व आपली मैत्रीण इशिका पारिख हिच्यासोबत गेला होता. मात्र इशिकाखेरीज पार्टीसाठी उपस्थित असलेल्या २७ जणांना तो ओळखत नव्हता. ‘मी रात्री मित्राकडे थांबणार आहे’ असा संदेश अथर्वने आपल्या वडिलांना मोबाइलवर पाठवला होता. परंतु, दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत तो न परतल्याने शिंदे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. तेव्हा या बंगल्याच्या मागील परिसरात अथर्वचा मृतदेह आढळला.

शवचिकित्सेत अथर्वचा डोळा सुजलेला, छातीचा पिंजरा आणि फुप्फुसाला अंतर्गत जखमा आढळल्या. शिवाय शरीरावर काही ठिकाणी मारहाणीचे वळ आढळले. आरे पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पार्टीत सहभागी २८ जणांची चौकशी केली. तसेच काही साक्षीदारांकडेही चौकशी केली. मात्र या घटनेला दहा दिवस लोटले तरीही अथर्वचा मृत्यू मारहाणीमुळे घडला का, असेल तर त्याला मारहाण करणारे कोण, मारहाणीचा हेतू काय यापैकी एकाही प्रश्नाचे ठोस उत्तर आणि पुरावे आरे पोलीस मिळवू शकले नाहीत.

मृत्यूनंतर पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही चित्रणात ८ मे रोजी सकाळी सातच्या सुमारास अथर्व या बंगल्यातून बाहेर पळताना दिसतो. त्यावेळी त्याच्या पायात बूट नसल्याचे दिसून येत आहे. त्याचा चष्माही सोबत नसल्याचे दिसून आले. येथून बाहेर पडल्यानंतर त्याने एक रिक्षाचालक तसेच आणखी एकाकडे मोबाइल देण्याची विनंती केली. मात्र, कोणीही त्याला मदत केली नाही. बंगल्याच्या मागील बाजूस बेशुद्धावस्थेत पडलेल्या अथर्वला अनेकांनी पाहिले मात्र, कोणीही त्याला वैद्यकीय मदत देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. हे सर्व संशयास्पद असल्याचे शिंदे कुटुंबीयांनी पत्रात म्हटले आहे. त्या दिवशी त्या बंगल्यात काहीतरी घडले आहे.

अथर्वला बेदम मारहाण व मानसिक छळ करण्यात आला. असे असताना पार्टीला उपस्थित २८ जणांच्या चौकशीतून नेमके चित्र स्पष्ट होत नाही, हे आश्चर्यकारक असल्याचा दावा शिंदे कुटुंबीयांनी केला आहे.

अथर्वचा मृत्यू नैसर्गिक आहे, हे स्पष्ट करण्याची धडपड आरे पोलिसांनी आरंभल्याचा आरोपही शिंदे कुटुंबाकडून होत आहे. बंगल्यात पार्टीसाठी उपस्थित सर्वच युवकांना हत्येच्या गुन्ह्य़ात संशयित म्हणून अटक करावी, पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करावी, त्यांच्या ब्रेन मॅपींग, लाय डीटेक्टर आणि नार्को अ‍ॅनालीसीस या चाचण्या कराव्यात, अशी मागणीही शिंदे कुटुंबाने केली आहे. अथर्वच्या गुप्तांगालाही इजा होत्या.

त्यामुळे अथर्ववर मारहाणीसोबत लैंगिक अत्याचारही घडल्याचा संशय शिंदे कुटुंबाने वरिष्ठांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केला आहे.