रस्ते घोटाळ्यात अडकलेल्या सहा कंत्राटदारांविरोधात मुंबई महानगरपालिकेने बुधवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पालिकेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आर. के. मधानी, रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्टस लिमि., महावीर रोड इन्फ्रास्ट्रक्टर प्रा. लि., जे. कुमार, के. आर. कन्स्ट्रक्शन आणि आर.पी.एस. यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सहा जणांविरोधात फसवणूक, खोटी कागदपत्रे तयार करणे आणि गुन्हेगारी कट रचणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मुंबईमधील रस्त्यांच्या कामामध्ये मोठय़ा प्रमाणावर घोटाळा होत असून नालेसफाईप्रमाणेच याही कामांची चौकशी करावी, अशी मागणी महापौर स्नेहल आंबेकर यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांना गोपनीय पत्र पाठवून केली होती. त्यानुसार अजय मेहता यांनी रस्ते कामांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
चौकशी समितीने काही दिवसांपूर्वी चौकशीचे काम पूर्ण करून आपला अहवाल अजय मेहता यांच्याकडे सादर केला होता.