खासगी वाहनांवर लाल आणि अंबर दिवे लावणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. यापुढे अशा वाहनचालकांवर केवळ १०० रुपये दंड न आकारता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मंगळवारी नवघर पोलिसांनी असे दिवे लावणाऱ्या दोन वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्याजवळ नवघर पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर हर्णे आणि त्यांच्या पथकाने एक खासगी मर्सिडिज आणि एक स्कॉर्पिओ गाडी अडवली. या दोन्ही वाहनांवर लाल दिवे लावण्यात आले होते. मर्सिडीजचा वाहन चालक निलेश पांचाळ तसेच स्कॉर्पिओचा चालक साहेबराव पोटफोडे यांच्याकडे कुठलेही सरकारी ओळखपत्र आढळले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कलम १७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अशा पद्धतीने मागील आठवडय़ापासून तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.