|| जयेश शिरसाट

दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंवर डल्ला; पंधरवडय़ात तीन घटना

लग्नमंडपातील धावपळ आणि गोंधळ यांचा फायदा घेत वऱ्हाडी मंडळी तसेच वधुवरांचे दागिने तसेच अन्य मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारण्याचे प्रकार मुंबईत वाढू लागले आहेत. कोणालाही संशय येऊ नये, यासाठी लहान मुलांना वऱ्हाडामध्ये मिसळून अशा चोऱ्या करणाऱ्या टोळय़ा सक्रिय झाल्या असून गेल्या १५ दिवसांत अशा प्रकारच्या तीन घटना उघड झाल्या आहेत. मानापमानाच्या भीतीने लग्नमंडपात अनोळखी व्यक्तींवरही संशय घेणे यजमान मंडळी टाळत असल्याने चोरटय़ांनी मौल्यवान ऐवज लुटण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ओशिवरा पोलिसांनी अलीकडेच अल्पवयीन बालकासह महिलेला अटक केली. अंधेरी येथे ३ डिसेंबर रोजी एका विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींमध्ये मिसळून बालकाने वधूपक्षाच्या पाहुण्यांसाठी राखून ठेवलेल्या खोलीतून ५ तोळ्यांचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. लग्नात काढलेली छायाचित्रे, आसपासच्या सीसीटीव्हींचे चित्रण पाहून ओशिवरा पोलिसांनी याच परिसरातल्या अन्य लग्न सोहळ्यात सापळा रचून दोघांना बेडय़ा ठोकल्या. हे दोघे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. आणखी एका लग्नकार्यात हात साफ केल्यानंतर हे दोघे आणि त्यांची टोळी आपल्या गावी जाणार होती.

चौकशीत या दोघांनी बोरिवली, एमआयडीसी आणि जुहू येथील लग्न समारंभांत मिसळून २० लाखांहून जास्त मुद्देमाल चोरल्याची माहिती पुढे आल्याचे ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शैलेश पासलवार यांनी सांगितले. यापैकी एक चोरी याच महिन्यात घडली, तर उर्वरित दोन गुन्हे वर्षभरातील आहेत. या घटनेनंतर ९ डिसेंबरला शीव येथील साधना शाळेच्या सभागृहात झालेल्या एका लग्नातून सुमारे दोन लाखांचा, तर १० डिसेंबरला बोरिवली पूर्वेकडील लोहार-सुतार वेल्फेअर सेंटरमधून एक लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला.

शहरातील विवाह सोहळ्यांमध्ये अशा पद्धतीने होणाऱ्या चोऱ्या नव्या नाहीत. शीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० सभागृहांमध्ये प्रत्येक मुहूर्ताला लग्न सोहळे पार पडतात. शहराच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरासरी पाच ठिकाणी सभागृहे, मोकळ्या मैदानात, शाळा-महाविद्यालयांच्या आवारात विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात येते. मुहूर्तानुसार डिसेंबर महिन्यात शहरातील प्रत्येक सभागृह, हॉल, वातानुकूलित बँक्वेटमध्ये लग्न सोहळ्यांचा सपाटा लागेल. तेव्हा यजमानांनी, येणाऱ्या पाहुण्यांनी सतर्क राहावे, अशा सूचना पोलीस करत आहेत.

संघटित टोळी

या बालकांमागे एक संघटित टोळी असून शहरातील कोणत्या भागात लग्न सोहळे आहेत, दोन्ही यजमानांची आर्थिक परिस्थिती आणि मंडपाची रचना याची पाहाणी या टोळीतील काही जण करतात. उर्वरित टोळी लांब पल्ल्यांच्या गाडय़ा थांबतील अशा स्थानकांवर बालकांची वाट पाहात थांबते. बालके येताच ही टोळी शहर सोडून निघून जाते.

बालकेच का?

सहसा लहान मुलांवर संशय घेतला जात नाही. ती सहज मंडपात प्रवेश करू शकतात. चोरी करताना पकडल्यास निव्वळ माफीवर सुटका होऊ शकते, हा विचार करून टोळ्यांनी बालकांना प्रशिक्षित केल्याची माहिती पोलिसांकडून मिळते.

गुन्ह्य़ाची पद्धत

आठ ते १२ वर्षे वयोगटातील प्रशिक्षित बालके चांगला पोशाख परिधान करून लग्न मंडपात प्रवेश करतात. त्यापैकी एक मंचावर वधू-वरांच्या शेजारी रेंगाळतो. दुसरा मंडपात. दोघांचे लक्ष आहेर, भेटवस्तू गोळा करणाऱ्या व्यक्तीकडे आणि वधू-वराच्या खोल्यांवर असते. विधी पार पडेपर्यंत, वधू-वर भेटवस्तू स्वीकारेपर्यंत ही बालके दबा धरतात. नंतर मंडपातील गजबज कमी झाली की संधी साधून ही मुले चोरी करतात आणि पळ काढतात.