25 September 2020

News Flash

गुन्हेगारी जगतातील ‘रावणा’कडून पिल्लेचा श्री गणेशा.. 

सिंगापूरमध्ये अटक झाली तेव्हा भारताच्या हवाली करू नये यासाठी त्याने जोरदार न्यायालयीन लढा दिला.

 

गुन्हेगारी जगतात ‘रावण’ म्हणून परिचित असलेल्या अमर नाईक टोळीत सामील होऊन गुन्हेगारीचा श्रीगणेशा कुमार पिल्ले याने केला होता.  कुमार पिल्ले याच्या विरुद्ध १२ गुन्हे दाखल होते. त्याचे वडील कृष्णा हे तस्कर म्हणून कुप्रसिद्ध. अमर त्यांना आपला ‘बॉस’ मानत होता. १९८९ मध्ये दाऊद टोळीने कृष्णा पिल्ले यांची हत्या केली आणि कुमारने या हत्येचा बदला घेऊन गुन्हेगार जगतात अमरच्या साथीने प्रवेश केला.

वडिलांच्या खुनाचा बदला घेत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, असा पण करणाऱ्या कुमारने या हत्याकटातील प्रमुख सूत्रधार तत्कालीन नगरसेवक लालसिंग चव्हाण याची बोरिवली रेल्वे स्थानकात हत्या घडवून आणली. अहमदाबादला गेलेल्या चव्हाण याचा तेथून पाठलाग केला. या हत्येसाठी अमर नाईकने त्याला मदत केली. त्यानंतरच त्याने पायात चप्पल घालण्यास सुरुवात केली. या खुनाच्या आरोपातून तो पुराव्याअभावी सुटला.

१९९६ पर्यंत त्याच्या नावावर गावदेवीतील गोळीबार आणि विक्रोळीतील मारामारी असे गुन्हे वगळले तर फारशी नोंद नव्हती. या दोन्ही गुन्ह्य़ातून निर्दोष सुटलेला कुमार १९९७ मध्ये हाँगकाँगला पळून गेला आणि परतलाच नाही. हाँगकाँगच्या नागरिकत्वासाठी सात वर्षे वास्तव्य आवश्यक असल्याची त्याला कल्पना होती.

वडील कृष्णा पिल्ले या नावे कपडय़ांचा व्यवसाय सुरू करून प्राप्तिकर भरण्यास सुरुवात केली. कृष्णा कुमार पिल्ले असे नाव धारण करून २००८ मध्ये हाँगकाँगचे नागरिकत्व मिळाले आणि त्याने पासपोर्टही मिळवला. युरोप आणि अमेरिकावारी सतत करीत असणाऱ्या कुमारचे वास्तव्य पत्नी-मुलीसह हाँगकाँगलाच होते. त्याची मुलगी सध्या दहावीत असून पुढील शिक्षणासाठी तिला अमेरिकेत पाठविण्याचा त्याचा प्रयत्न होता.

त्यामुळेच सिंगापूरमध्ये अटक झाली तेव्हा भारताच्या हवाली करू नये यासाठी त्याने जोरदार न्यायालयीन लढा दिला. सिंगापूरमधील प्रसिद्ध निवृत्त न्यायाधीशाला आपले वकीलपत्र दिले होते. परंतु न्यायालयाचा निकाल विरुद्ध गेला आणि वरच्या न्यायालयात अनुकूल दाद मिळणार नाही, असे वाटल्यानंतरच भारताच्या हवाली होण्यावाचून त्याला पर्याय राहिला नाही. गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अजय सावंत, विनय घोरपडे, शंकर इंदलकर, विनोद राणे या अधिकाऱ्यांचे पथक २३ जून रोजी सिंगापूर येथे गेले आणि या पथकाला २७ जून रोजी त्याचा रीतसर ताबा मिळाला. गुन्हे विभागाचे सहायक आयुक्त  प्रफुल्ल भोसले यांनी तयार केलेल्या डोसिअरमुळेच त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त देवेन भारती यांनी पुढाकार घेतला होता. या नोटिशीमुळेच तो जेरबंद होऊ शकला.

त्याची पत्नी व मुलगी हाँगकाँगमध्ये आहे तर आई विक्रोळी येथे शाळा चालविते. गुन्हे अन्वेषण विभागाने त्याची चौकशी सुरू केली तेव्हा तो बोलून गेला की, या निमित्ताने आईला तरी भेटायला मिळेल..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 4:49 am

Web Title: crime in mumbai 2
Next Stories
1 अंधेरीतील औषधाचे दुकान खाक
2 महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा प्रसार करा
3 पुन्हा मनसेचा विकास आराखडा
Just Now!
X