News Flash

समाजमाध्यमावरून मैत्री करून घरफोडी

‘टिकटॉक’ वापरकर्ता अटकेत

संग्रहीत

समाजमाध्यमावरून महिलांशी मैत्री करून त्यांच्या घरी चोरी करणाऱ्या एका टिकटॉक वापरकर्त्यांला ओशिवारा पोलिसांनी शनिवारी अटक केली. एका मॉडेलच्या घरातून त्याने सुमारे ४ लाख ८९ हजार रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. अभिमन्यू अर्जुन गुप्ता (२८) असे आरोपीचे नाव आहे.

ओशिवरा भागातील विजय विशाल इमारतीत ही अभिनेत्री वास्तव्याला आहे. समाजमाध्यमातील मित्रांच्या समूहामधून अभिमन्युशी तिची ओळख झाली होती. टिकटॉकवर बंदी आल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याचे अभिमन्यूने या मैत्रिणीला सांगितले होते. तसेच आर्थिक अडचणीमुळे राहण्याची इतरत्र व्यवस्था नसून काही दिवस तिच्या घरी राहण्याची परवानगी मागितली होती. या अभिनेत्रीच्या घरी वास्तव्याला असताना अभिमन्यूने ती दागिने कुठे ठेवते, हे पाहिले होते. ती चित्रीकरणासाठी परगावी गेल्याची संधी साधून अभिमन्यूने १९ डिसेंबरला घरी चोरी केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिली.

घरफोडीदरम्यान सीसीटिव्ही चित्रणात चेहरा दिसू नये, यासाठी त्याने बुरखा परिधान केला होता. स्वत:वर संशय येऊ नये यासाठी घराचा दरवाजा तोडून त्याने आतमध्ये प्रवेश केला होता. तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून ठेवले. त्याने घरातील कपाटाचे लॉकर फोडून चार लाख ४४ हजार रुपयांचे दागिने आणि ४५ हजार रुपयांची रोख रक्कमेची चोरी केली.

सीसीटिव्ही चित्रणात दिसणारी बुरखाधारी व्यक्ती पुरुष असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तपासात बुरखाधारी व्यक्ती आणि अभिमन्यूची चालण्याची पद्धती एकसारखी वाटल्याने पोलिसांना त्याचा संशय आला. पोलीस उपनिरीक्षक तुषार सावंत यांच्या पथकाने अभिमन्यूला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले. अशाचप्रकारे चोरी केल्याचे सात गुन्हे अभिमन्यू शहरातील विविध पोलीस ठाण्यात नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 2:42 am

Web Title: crime in mumbai mppg 94 2
Next Stories
1 बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री
2 एसटीची ‘शिवशाही’ वातानुकूलित शयनयान सेवा बंद
3 मोफत लस देण्यासाठी केंद्राच्या निर्णयाची प्रतीक्षा – राजेश टोपे
Just Now!
X