कमी मनुष्यबळामुळे गुन्ह्य़ांवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची दमछाक होणार

मुंबई : टाळेबंदी शिथिल होताच मुंबईतल्या गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे एकीकडे करोना संसर्ग आणि दुसरीकडे गुन्ह्य़ांवर नियंत्रण ठेवताना पोलिसांची पुरती दमछाक होण्याची शक्यता आहे.

दोन महिन्यांहून अधिक कालावधीच्या टाळेबंदीत गुन्ह्य़ांचा आलेख कमी झाला होता. रस्ते, बाजारपेठा, रेल्वे स्थानके  आदी सर्वच गजबजलेल्या ठिकाणांवर शुकशुकाट होता. त्यामुळे रस्त्यांवरील गुन्हे विशेषत: सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, मोबाइल चोरी, वाटमारी, पोलीस असल्याचे भासवून फसवणूक, खांद्यावर किं वा वाहनावर थाप मारून चोरी, किरकोळ कारणावरून हाणामारी, शिवीगाळ, विनयभंग, पाठलाग आदी गुन्ह्य़ांची संख्या लक्षणीय घटली होती. त्याचप्रमाणे घरफोडय़ाही थांबल्या. हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार आदी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांची संख्या मर्यादित राहिली होती.

राज्य पोलिसांच्या नोंदींनुसार या वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांत चोरीचे सात हजार गुन्हे राज्यात घडले.  गेल्या वर्षी या दोन महिन्यांत चोरीचे १५ हजारांहून अधिक गुन्हे घडले होते. राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये गुन्ह्य़ांचा आलेख आणखी खाली गेला. मे महिन्यातील घडलेल्या गुन्ह्य़ांची माहिती आयुक्तालये, अधीक्षक कार्यालयांकडून एकत्रित के ली जात आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या नोंदींनुसार हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, दरोडा, मारहाण, फसवणूक, बलात्कार, विनयभंग आदी गुन्ह्य़ांमध्ये सरासरी ६० ते ७० टक्के  घट झाली होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आदी महत्त्वाच्या शहरांमध्ये हेच चित्र होते. मात्र टाळेबंदी शिथिल के ल्यानंतर गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढू लागले आहे.

मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन महिन्यांनी रस्त्यांवर नागरिक, वाहनांची गर्दी झाली. सर्व प्रकारची दुकाने रात्री ९ पर्यंत खुली झाल्याने उद्याने, सार्वजनिक ठिकाणी व्यायाम आदींना परवानगी मिळाल्याने नागरिक घराबाहेर पडू लागले. परिणामी रस्त्यांवरील गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढले. गेल्या तीन दिवसांत शहरात चोरी, घरफोडी, मारहाण आदी गुन्ह्य़ांसह अपघातही वाढले. त्यामुळे आता पोलिसांना करोनासह गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

अपुरे मनुष्यबळ

* गर्दी होणार तसे हाणामारीसह अन्य गंभीर गुन्हे वाढणार. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळात करोना संसर्गासह गुन्हे रोखताना पोलिसांना बरीच धावपळ करावी लागेल.

* करोना संसर्गाची लागण होऊ नये म्हणून ५५ वर्षांपुढील अंमलदार घरीच आहेत. ५२ वर्षांपुढे असलेल्या आणि रक्तदाब, मधुमेह किं वा गंभीर आजार असलेल्यांनाही घरीच थांबवण्याच्या सूचना आहेत. याशिवाय सुटी घेतलेले, करोनाबाधित, बाधितांच्या संपर्कात आल्याने विलगीकरणात असलेल्यांची संख्या मोठी आहे.

* उरलेल्या मनुष्यबळाला पुरेसा आराम मिळावा, रोगप्रतिकारक शक्ती राखली जावी म्हणून १२ तास कर्तव्य के ल्यावर २४ तास आराम दिला जात आहे, याकडे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी लक्ष वेधतात.