मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण

पुणे-राहुरी येथील महात्मा फुले कृषी महाविद्यालयाच्या भूखंड वादाप्रकरणी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आदेश दिल्यानंतरच सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले. तसेच गावंडे यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यच्या पुढील कारवाईस न्यायालयाने पोलिसांना मज्जाव केला.

गावंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, असे तोंडी आदेश खडसे यांनी दूरध्वनीवरुन दिले आहेत. त्याचआधारे गुन्हा दाखल केला जात आहे, असे शिवाजीनगर पोलिसांनी स्टेशन डायरीमध्ये नमूद केले आहे. खडसे यांचे भोसरी ‘एमआयडीसी’तील भूखंड प्रकरण गावंडे यांनीच उघडकीस आणले आहे. त्यांनी उच्च न्यायालयातही प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून घेऊन स्वतंत्र यंत्रणेकडे देण्याची मागणी केली आहे.

गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी गावंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी पोलिसांनी सादर केलेल्या स्टेशन डायरीच्या आधारे खडसे यांनी दूरध्वनीवरून आदेश दिल्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे गावंडे हे अंतरिम दिलासा मिळण्यासाठी पात्र आहेत, असे नमूद करत न्यायालयाने त्यांची याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली. कृषी महाविद्यालयाचा भूखंड भट कुटुंबियांच्या वशंज यशदाबाई नारायण विद्वांस यांच्याकडून खरेदी केल्याचा गावंडे यांचा दावा आहे. या प्रकरणात खडसे यांनी फौजदारी गुन्ह्यसाठी पोलिसांवर दबाव आणला, असा दावाही गावंडे यांनी याचिकेत केला आहे.