उकल होण्याचे प्रमाण कमी
राज्यात जबरी चोऱ्यांसह अन्य गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत असून गुन्ह्य़ांची उकल होण्याचे प्रमाण २० ते २५ टक्के इतकेच आहे. भर रस्त्यात किंवा उघडय़ावर दिवसाढवळ्या चोऱ्या वाढल्या असून त्यात साखळी चोऱ्यांचे प्रमाण ४० ते ४५ टक्के इतके आहे. भर दिवसा लूटमार होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असून पोलिस दल या प्रकारांना पायबंद घालण्यास अपयशी ठरत आहे. गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाण वाढले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा सांगितले असले तरी त्यांचे उकल होण्याचे प्रमाण मात्र तुलनेने अजून कमीच आहे.
राज्यातील पोलिस ठाण्यांमध्ये नोंदल्या गेलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्य़ांची माहिती संकलित करुन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून पोलिस महासंचालकांमार्फत गृहखात्यास साप्ताहिक अहवाल पाठविला जातो. अतिरिक्त महासंचालक संजय कुमार यांच्या १६ ते २२ ऑगस्टच्या अहवालातील आकडेवारीचे विश्लेषण केले असता या बाबी उघड होत आहेत. साधारणपणे दरआठवडय़ाला किरकोळ प्रमाणात गुन्ह्य़ांचे प्रमाण कमी जास्त होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या आठवडय़ात १४६ जबरी चोरीचे गुन्हे नोंदले गेले आणि त्यापैकी ४७.२६ टक्के म्हणजे ६९ गुन्हे साखळी चोरीचे होते. त्यापैकी २५ गुन्हे हे सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेतील आहेत, असे विश्लेषणातून दिसून येते. मुंबईत ३४ गुन्हे नोंदले गेले. भर दिवसा हे प्रकार अधिक होत आहेत. राज्यात गेल्या सात महिन्यात जबरी चोरीचे १२९५ गुन्हे नोंदले गेले आहेत. नोंदल्या गेलेल्या १४६ पैकी ३२ गुन्ह्य़ांची उकल झाली आहे.
मोटारसायकलवरुन अचानकपणे येऊन लूटमार करण्याच्या प्रकारांना आळा घालणे कठीण असून आरोपी शोधणेही अवघड बनल्याने पोलिस दलासाठी ती डोकेदुखी ठरली आहे. पण त्यामुळे सर्वसामान्यांना भर दिवसा व उघडय़ावरही लुटले जाण्याची भीती वाटत असून पुढील दोन महिने सणासुदीचे असल्याने हे प्रकार वाढण्याची शक्यता आहे. बीट मार्शल, पोलिसांची गस्त अशा उपाययोजना करण्यात येत असल्या तरी या गुन्ह्य़ांना आळा बसू शकलेला नाही.