निशांत सरवणकर

अक्षयकुमारचा ‘स्पेशल २६’ हा हिंदी चित्रपट खरं तर मुंबईत काही दशकांपूर्वी घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित होता. मुंबईसह अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या त्या घटनेतील आरोपींचा शोध आजतागायत लागलेला नाही. पण ‘स्पेशल २६’पासून प्रेरित होऊन आपली ‘स्पेशल ५’ची टीम बनवणाऱ्या एका टोळीला मात्र, काशिमिरा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.

चित्रपट हा मनोरंजनाचा मार्ग असतो, परंतु गुन्हेगारीविषयक चित्रपट हा कधी कधी गुन्हेगारांसाठी कल्पनादायक ठरतो. असाच काहीसा प्रकार सांताक्रूझ परिसरात घडला आणि अभिनेता अक्षयकुमारच्या ‘स्पेशल २६’ चित्रपटाची आठवण आली. फक्त हे सर्व २६ नव्हते तर ते होते फक्त पाच. बनावट प्राप्तिकर अधिकारी बनून बेहिशेबी रोकड व दागिने लंपास करण्याचा त्यांचा डाव होता. प्राप्तिकर अधिकारी असल्याबाबत ओळखपत्र व साधारण तसाच पेहराव करून ते घरात शिरत असत आणि आपला डाव साध्य करीत असत. काशिमिरा पोलीस ठाण्याने त्यांना ताब्यातही घेतले. तेव्हा मुंबईतही त्यांनी तसाच गुन्हा करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती बाहेर आली.

‘स्पेशल पाच’ टीमचा म्होरक्या फियाज काझी (४८) यानेही शाळा सोडलेल्या मुलांचा चमू बनवला. १९ ते २५ वर्षे वयोगटांतील गरजू तरुणांना हेरून आपण प्राप्तिकर अधिकारी असल्याचा बनाव केला. अनेक शहरांतून त्यांनी अशाप्रकारे काही ऐवज लुटला. परंतु मुंबईत त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. कालांतराने ते पकडले गेले.

सांताक्रज येथे राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरांची बेल त्यांनी वाजविली. घरात त्या व्यावसायिकाची पत्नी एकटी होती. प्राप्तिकर खात्याचे अधिकारी आहोत, घरांची झडती घ्यायची आहे, असे सांगून प्राप्तिकर खात्याचे ओळखपत्रही दाखविले. घरात रोकड फारशी सापडली नाही. मात्र जे महागडे दागिने होते त्याच्या पैसे व कर भरल्याच्या पावल्या होता. मूल्याधारित कर तसेच वस्तू व सेवा कर भरल्याच्या पावत्याही होत्या. त्यामुळे हे बोगस प्राप्तिकर अधिकारी चपापले. दागिने हस्तगत करता येत नव्हते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले. सर्व दागिन्यांच्या खरेदी पावत्या असल्यामुळे तुम्हाला ते हस्तगत करता येणार नाहीत, अशी भूमिका व्यावसायिकाच्या पत्नीने घेतल्यानंतर ते गडबडले. स्थानिक पोलिसांना हजार रुपये द्या, असे ते सांगू लागले. शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या व्यावसायिकाच्या पत्नीला संशय आला. तिने आरडाओरड सुरू केला तसा या पाच जणांनी पोबारा केला. जाताना या पाच जणांनी दागिने नेले नाहीत, पण ते फसवणुकीच्या हेतूने आले होते हे स्पष्ट होते. त्यामुळे या पाच जणांकडून आणखी कोणाला बळी बनविले जाण्याची शक्यता असल्यामुळे सांताक्रूज पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. संबंधित सोसायटीत सीसीटीव्ही फुटेज असले तरी त्यांची छायाचित्रे स्पष्ट दिसत नव्हती. मात्र व्यावसायिकाच्या पत्नीने सांगितलेल्या वर्णनावरून रेखाचित्रे तयार करून या टोळीचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवरही ही रेखाचित्रे पाठविण्यात आली. काशिमिरा पोलिसांच्या हद्दीत झालेल्या अशाच पद्धतीच्या घटनेतील आरोपींशी ही रेखाचित्रे मिळतीजुळती असल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी एकाला ताब्यात घेतल्यानंतर अन्य चार जणांना अटक करण्यात पोलिसांना मग वेळ लागला नाही.

‘स्पेशल २६’ या चित्रपटावरूनच प्रेरणा घेतल्याची कबुली त्यांनी दिली. विविध सोसायटीतील पार्क केलेल्या मर्सिडिज, ऑडी वा आलिशान महागडय़ा गाडय़ांवर ते नजर ठेवत असत. इमारतीच्या वॉचमनकडून ते अधिक माहिती घेत असत. घरात कोण कोण असते हे स्पष्ट झाल्यावर एकटी महिला असलेल्या घरात ते शिरत असत. प्राप्तिकर अधिकारी असल्याचे म्हटल्यावर अनेकांना घाम फुटत असे. त्याचाच फायदा उठवीत, तपास करण्याच्या बहाण्याने कधी रोकड तर कधी दागिने ते घेऊन जात असत. त्यानंतर आपण फसले गेल्याचे संबंधितांना कळत असे. काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच एका व्यावसायिकेला फसविण्यात आले होते. या गुन्ह्य़ातील आरोपींना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी म्होरक्या फियाज काझी याला व्यावसायिकाच्या पत्नीनेही ओळखले. मग मानव सिंग (१९), शोएब मुन्शी (१९), सलीम अन्सारी (२१) आणि इम्रान अली (२५) यांना अटक करण्यात पोलिसांना वेळ लागला नाही. गरजू तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लूट करण्याची गुन्ह्य़ाची पद्धत फोफावत चालली आहे.

पैसे कमावण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेल्या तरुणांना हेरून त्यांना नोकरीचे आमिष दाखविले जाते आणि त्यांच्याकडून गुन्हा करवून घेतला जातो. परंतु त्यांना जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सांताक्रूझच्या प्रकरणात या ‘स्पेशल पाच’चा डाव यशस्वी होऊ शकला नाही. परंतु व्यावसायिकाने केलेल्या तक्ररीची उपायुक्त परमजितसिंग दहिया यांनी स्वत: दखल घेतली. विशेष पथके स्थापन करून पाठपुरावा केला. त्यामुळे आणखी कोणी या टोळीला बळी पडले नाही.

nishant.sarvankar@expressindia.com

@ndsarwankar