पर्यावरणप्रेमी हे आरेमध्ये झाडे वाचवण्यासाठी एकत्र आले होते. पण, पर्यावरण वाचवणे हा जर गुन्हा असेल तर यापुढे तो वारंवार करत राहू, अशी भूमिका रविवारी आरेशी संबधित आंदोलकांनी घेतली. आरे वृक्षतोडप्रकरणी अटक करण्यात आलेल्या २९ आंदोलकांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या पोलीस कारवाईचा निषेध करण्यात आला. पोलीस कारवाईविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्या वकिलांनी यावेळी जाहीर केले.

आरेमध्ये जमा झालेले सर्वजण हे केवळ निषेध नोंदवण्यासाठी आलेले असताना त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करणे म्हणजे घटनात्मक अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे, अशी भूमिका यावेळी पर्यावरणप्रेमी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मांडली. उच्च न्यायालयात याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु असतानाच झाडे तोडण्याची कारवाई करण्याची घाई का करण्यात आली असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.

तसेच पोलिसांनी पर्यावरणप्रेमींवर कारवाई करताना नियमांचा भंग केला असून त्याबाबत उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले.

‘झाडे लावा, झाडे जगवा’ असे शाळेमध्ये शिकवले जाते, कारशेडच्या ठिकाणी शुक्रवारी एकत्र आलेले पर्यावरणप्रेमी हेच काम करत होते. मग हा गुन्हा आहे का?’ असा प्रश्न आरेमधील रहिवाशी प्रकाश भोईर यांनी यावेळी केला. त्यांच्या पत्नीला शनिवारी तुरुंगात पाठवण्यात आले होते. या कारवाईनंतर आरेमध्ये अजूनही पोलिसांचे बंधन असून, आदिवासींना एका पाडय़ावरुन दुसऱ्या पाडय़ामध्ये जाण्यासाठी जंगलाचा वापर करावा लागत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

‘शाळेतील झाडे लावा, झाडे जगवा या शिकवणुकीचा वापरच करायचा नसेल तर हा भाग शालेय शिक्षणातून काढून टाकावा, अशी मागणी यावेळी रिद्धी अनवणे हिने केली. तिचा भाऊ सिद्धार्थ अनवणे यालादेखील अटक करण्यात आली होती. पर्यावरण प्रेमींवर केलेली ही कारवाई हुकूमशाहीच असल्याचा आरोप तिने यावेळी केला.

‘माझा मुलगा पीएचडी करत असून, त्याने गाण्याच्या माध्यमातून वृक्षतोडीचा विरोध करणे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना धाक दाखवणे हे समीकरण काय आहे?’ असा प्रश्न एका पर्यावरणप्रेमी तरूणाच्या आईने यावेळी केला. आंदोलनात सहभागी झालेली मुले ही उच्चशिक्षित असून, त्यांना अशा पद्धतीने गंभीर गुन्ह्य़ांमधून अडकवून यापुढे कोणीही पर्यावरणाबाबत आंदोलन करणारच नाही, अशीच सरकारची भूमिका असल्याचा त्यांनी आरोप केला.

आरेमधील जिवाचा पाडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनी मनिषा धिंडे हिला परिक्षेला जाण्यासाठी सकाळी दहिसर पोलीस ठाण्यातून सोडले. पण, परिक्षेला जाताना तिला पुन्हा गोरेगाव चेकपोस्टपाशी अटक करण्यात आली होती. या संपूर्ण घटनाक्रमात पोलीसांकडून मिळालेली वागणूक ही अतिशय वाईट असल्याचे मनिषाने यावेळी सांगितले. तर महिला आंदोलकांना तेथून हटवताना महिला पोलीसांऐवजी पुरुष पोलिसांनी अनेकदा दमदाटी आणि आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप सुवर्णा साळवे हीने केला.