नवी मुंबईतील पॉप्युलर फायनान्स कंपनीमध्ये दिवसाढवळ्या टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री धारावीतून अटक केली. दरोडेखोरांनी एकूण ६ कोटी ९ लाख रुपये किमतीचा ऐवज पळवला होता. १५ दिवस नवी मुंबई, मुंबई पोलीस आरोपींचा शोध घेत होते.

नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पॉप्युलर फायनान्स कंपनीमध्ये ६ ऑगस्टला दुपारी तीन वाजता पाच शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश केला. कोयता आणि पिस्तूलचा धाक दाखवत त्यांनी कंपनीच्या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची, तसेच सामानाची तोडफोड करून तिजोरीतील २० किलो वजनाचे सोन्याचे दागिने आणि ९.५० लाख रुपयांची रक्कम असा एकूण ६ कोटी ९ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन स्विफ्ट डिझायर गाडीतून पोबारा केला. नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात दरोडय़ात वापरलेली गाडी कळंबोली परिसरात सापडली, मात्र या गाडीला लावण्यात आलेली नंबरप्लेट बनावट असल्याचे उघड झाले. नवी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दरोडाविरोधी पथकातर्फे या गुन्ह्य़ाचा समांतर तपास सुरू होता. पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू होता.  हा दरोडा मुंबईतील कुप्रसिद्ध दरोडखोर असलेल्या नाडर गँगने केल्याचे स्पष्ट होऊ लागले. अखेर नाडर टोळीनेच हा दरोडा घातल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी नाडरच्या मुसक्या या पथकाने आवळल्या. हा गुन्हा आपणच केल्याची कबुली नाडरने दिली.

  • दरोडय़ासाठी पाच तरुण जमवून स्वत: नाडर गाडीत त्यांची वाट पाहात बसला होता.
  • नाडरनेच या पूर्ण दरोडय़ाचे नियोजन केले होते. दरोडय़ानंतर पाचही जण पळून गेले; परंतु तो मुंबईतच ठाण मांडून होता.
  • आरोपींविरोधात मुंबई, नवी मुंबई, गुजरातमध्ये दरोडय़ाचे १७ हून अधिक गुन्हे आहेत.