मुंबई : शहरातील नाले, रस्ते, रेल्वे जलवाहिन्यांवरील अतिक्रमण आणि इतर प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या झोपडीधारकांसाठी चेंबूरच्या माहुल परिसरात बांधण्यात आलेल्या घरांची परस्पर विक्री करून सामान्यांना गंडा घालणाऱ्यांविरोधात तब्बल वर्षभरानंतर गुन्हा दाखल झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊन १५ दिवस झालेले असतानाही पोलिसांनी या प्रकरणात अद्याप एकालाही अटक केलेली नाही. त्यामुळे घरांची विक्री करणाऱ्या टोळीशी पालिका अधिकाऱ्यांबरोबरच पोलिसांनीही संबध प्रस्थापित केले नाही ना अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.

या ठिकाणी पालिकेची साडेबारा हजार घरे आहेत. यामधील दोनशेपेक्षा अधिक घरांची पालिका अधिकारी आणि काही माफियांनी एकत्र येत परस्पर विक्री केली होती. यामध्ये अनेकांची फसवणूक झाल्याने त्यांनी याबाबत चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी वर्षभरानंतरही यामध्ये केवळ दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहूल गाव परिसरात गेल्या १० ते १२ वर्षांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ४६ इमारती बांधल्या. यामध्ये १२ हजार ७१४ घरे आहेत. ही सर्व घरे एमएमआरडीने पालिकेच्या ताब्यात दिली आहेत. सध्या या सर्व घरांचा ताबा हा पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयाकडे आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून यातील अनेक इमारती रिकाम्याच असल्याने याच परिसरात राहणाऱ्या काही माफियांनी पालिकेच्या एम पश्चिम कार्यालयातील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरत या घरांची तीन वर्षांपूर्वी परस्पर विक्री सुरू  केली. सात ते आठ लाखांत चेंबूरमध्ये घर मिळत असल्याने अनेक गरीब लोकांनी कर्जबाजारी होऊन या ठिकाणी आपल्या घरांचे स्वप्न पूर्ण केले. मात्र पालिकेच्या मुख्य कार्यालयाला याची माहिती मिळताच त्यांनी घुसखोरी केलेल्या सगळ्या कुटुंबांना बाहेर काढले. त्यामुळे अनेकांचे संसार उघडय़ावर आले.

फसवणूक झालेल्या प्रकाश जाधव यांच्यासारख्या अनेकांनी चेंबूरच्या आरसीएफ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांकडून दखलच घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. अखेर वरिष्ठांच्या आदेशानंतर १७ एप्रिलला आरसीएफ पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या सुरेशकुमार दास आणि नझीर शेख या दोघांवर गुन्हे दाखल केले. मात्र १५ दिवसांनंतरही पोलिसांनी या आरोपींना अटक केलेली नाही. या दोन्ही आरोपींसोबत आरसीएफ पोलीस ठाण्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगले संबध असल्याने पोलीस त्यांना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या दोघांबरोबरच पालिकेचे अधिकारीही यात सामील असून त्यांनी आम्हाला लुबाडले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या फसवणूक प्रकरणात अद्याप कोणालाच अटक झालेली नसून तपास सुरू आहे, तसेच यामध्ये पालिका अधिकारी आरोपी नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

– श्रीकांत देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आरसीएफ