राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धामध्ये मोठा घोटाळा
पुण्यात २००८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात मोठय़ा प्रमाणात आर्थिक अफरातफर केल्याप्रकरणी आयोजन समितीचे तत्कालीन अध्यक्ष आणि खासदार सुरेश कलमाडी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस विधिमंडळाच्या लोकलेखा समितीने केली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने दिलेल्या निधीचा मोठय़ा प्रमाणात कसा अपव्यय करण्यात आला, यावर या अहवालात दृष्टिक्षेप टाकण्यात आला असून समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी बुधवारी हा अहवाल विधिमंडळास सादर केला. स्पर्धा संपल्यानंतर नियोजन समितीने सरकारकडून घेतलेल्या ३२ कोटींचा अद्याप हिशेब लागलेला नाही. तसेच ज्या बँकेतून हा निधी वितरित करण्यात आला त्याचीही कागदपत्रे गायब असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच सरकारच्या आकस्मिकता निधीतून मिळालेल्या निधीचा विनियोग करताना क्रीडा संचालक आणि लेखाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असून त्यांच्यावर कठोर करवाई करण्याची शिफारसही समितीने केली आहे. बालेवाडीत खेळाडूंसाठी सहा एकर जागेत हॉटेल आणि वसतिगृह निर्माण करण्यात येणार होते. मात्र त्यातील तीन एकर जागेवर अतिक्रमण करून परवानगी नसताना मंगल कार्यालय बांधून खासगी व्यक्तीने लाखो रुपये कमविल्याची बाबही सदनाच्या निदर्शनास आणण्यात आली.