मुंबईच्या गुन्हेगारीची कुंडली मांडताना दाऊद इब्राहिम हे नाव प्रथम क्रमांकावर असले, तरी दाऊदचा इतिहास छोटा राजनच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. एकेकाळी हातात हात घालून गुन्हेगारी विश्वाचे साम्राज्य उभे करणारे हे दोन मित्र मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेनंतर एकमेकांचे कट्टर शत्रू झाले आणि गुन्हेगारी विश्वावर या शत्रुत्वाचे सावट सतत दाटून राहिले.

मुंबईच्या चेंबूर उपनगरात टिळक नगर कॉलनीतील एका मध्यमवयीन कुटुंबातील राजन सदाशिव निकाळजेने बघता बघता दाऊदच्या साम्राज्याला धडका देण्यास सुरुवात केली. लहानपणापासूनच गुंडगिरीला चटावलेल्या राजनला त्या काळातील हाजी मस्तान, करीम लाला, वरदाभाई यांच्या गुन्हेगारी कारवायांची भुरळ पडली आणि त्याने आपला रस्ता निश्चित केला. चेंबूर परिसरात त्या वेळी वरदाभाईचा साथीदार आणि कामगार नेता म्हणविणारा राजन नायरच्या नावाचा दबदबा होता. गल्लीतल्या लहानमोठय़ा मारामाऱ्या आणि छोटेमोठे गुन्हे करीत राजन नायरने आपले साम्राज्य प्रस्थापित केले. चेंबूर परिसरात बडा राजन नावाची एक दहशत तयार झाली. राजन निकाळजेही त्यात सामील झाला. चेंबूर परिसरात सिनेमा तिकिटांचा काळाबाजार सुरू करून राजन निकाळजेने आपल्या गुन्हेगारी कारकीर्दीची सुरुवात केली. बडा राजनच्या कानावर त्याच्या कारनाम्यांच्या कहाण्या पडू लागल्या आणि बडा राजनने राजन निकाळजेला आपल्या पंखाखाली घेतले. लहानमोठय़ा गुन्ह्य़ांची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यास सुरुवात केली आणि राजन निकाळजे बडा राजनचा उजवा हात बनला. पोलीस दप्तरात छोटा राजनच्या गुन्हेगारी कारवायांची नोंद सुरू झाली..
१९९३ मध्ये बॉम्बस्फोट मालिकांनंतर राजन आणि दाऊद यांच्यातील वैराला हिंदू-मुस्लीम अशा धार्मिक वादाचेही रंग लागले. सूडाने पेटलेल्या राजनच्या टोळीने दाऊदच्या टोळीतील पाच जणांना टिपले आणि नवा डॉन म्हणून छोटा राजनने आपल्या टोळीचे स्वतंत्र अस्तित्व जाहीर केले. २००० मध्ये छोटा राजनवर दाऊदच्या हस्तकांनी प्राणघातक हल्ला केला. त्यातून तो बचावला व रुग्णालयात उपचार घेतानाच राजनने पोबारा केला.
‘राजननामा’
१९८०च्या दशकात, छोटा राजनचे गुन्हेगारी जग आणखी विस्तारले होते. खून, खंडणी, हाणामारीच्या सुपाऱ्या घेत छोटा राजन हळूहळू आपले साम्राज्य प्रस्थापित करत होता. त्याच दरम्यान गुन्हेगारी विश्वाच्या नाडय़ा आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. वरदाभाईचे साम्राज्य पोलिसांनी उखडून टाकले होते. हाजी मस्तान आणि करीम लाला यांच्यातील दुश्मनीने टोक गाठले होते. दाऊद इब्राहिमने हाजी मस्तानच्या साम्राज्यावर आपली पकड बसविली होती.
बडा राजनने दाऊदशी हातमिळवणी केली आणि पठाणांच्या टोळीशी झालेल्या संघर्षांत बडा राजन मारला गेला. छोटा राजनचे छत्रच हरपले. त्याला आता भक्कम आधाराची गरज वाटत होती. त्याच्या घराशेजारच्याच एका इमारतीत राहणाऱ्या तरुणीशी त्याचे भावनिक नाते जुळले आणि योगायोगाने दाऊद इब्राहिमने तिला बहीण मानले. ही तरुणी दाऊदला राखी बांधू लागली. या नात्यामुळे छोटा राजन आणि दाऊद एकमेकांच्या अधिक जवळ आले आणि छोटा राजन दाऊदचा विश्वासू साथीदार बनला.

..आणि राजनने संपर्क साधला होता

रश्मी राजपूत/ दीप्तिमान तिवारी/ सांगिक चौधरी, मुंबई/नवी दिल्ली
छोटा राजनच्या अटकेच्या वृत्ताबाबत संभ्रम निर्माण झाल्यावर पोलिसांनी सर्वप्रथम परदेशात वास्तव्य करणाऱ्या विश्वासू खबऱ्याशी संपर्क साधला. मात्र दोन दिवसांपासून तो संपर्कात नाही, असा संदेश मिळाला. मात्र त्यानंतर राजनला अटक झाल्याची अधिकृत माहिती सीबीआयने दिली. दोन दशकांहून अधिक काळ गुंगारा देणाऱ्या राजनला ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून अटक झाली.
उच्चपदस्थ सूत्रांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, वर्षभरापासून राजन ऑस्ट्रेलियात होता आणि त्याने चार-पाच महिन्यांपूर्वी भारतीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. राजनचा उजवा हात असलेल्या विकी मल्होत्राशी माजी गुप्तचर प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांचा संबंध होते, असे अमेरिकेच्या एका संदेशावरून स्पष्ट होते. दिल्लीत वाहन चालवत असताना मल्होत्राला मुंबई पोलिसांनी ११ जुलै रोजी अटक केली होती. त्या वेळी त्याच्यासमवेत दोवल होते. मल्होत्रा आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली. आम्ही राजनच्या हालचालींवर नजर ठेवली आणि इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानुसार इंडोनेशियाच्या पोलिसांनी त्याला अटक केली, असे सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांनी सांगितले.

छोटा राजनच्या हाती मुंबईतील गुन्हेगारी साम्राज्याची सूत्रे सोपवून दाऊद दुबईला पळून गेला. यातच अरुण गवळी, अमर नाईक, दशरथ रहाणे गुंड उदयाला येत होते. या टोळ्यांमधील संघर्ष उफाळला. दाऊद टोळीतही संघर्षांच्या ठिणग्या पडू लागल्या. यातूनच छोटा राजन आणि दाऊद यांच्यात वितुष्टाची बीजे पेरली गेली.

दाऊदने कारस्थानाने शिवसेनेचा नगरसेवक खिमबहादूर थापा याची हत्या केली. थापा हा राजनचा विश्वासू. सुनील सावंत ऊर्फ सावत्या या दाऊदच्या हस्तकानेच थापाला मारल्याची खबर राजनला लागली. त्यातच, राजनचा आणखी एक साथीदार दाऊदने संपविला. दोघांत समझोत्याचेही प्रयत्न झाले, पण छोटा राजनने दाऊदचा प्रस्ताव नाकारून कठोर विरोध पत्करला.

अनेक गुन्ह्यांत छोटा राजन मुंबई पोलिसांना हवा आहे. त्याची भारतात रवानगी केल्यानंतर, त्याला मुंबईत आणण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरला जाईल.
– राम शिंदे, गृह राज्यमंत्री

आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांनी राजनची अटक ही अत्यंत महत्त्वाची घटना असल्याचे म्हटले आहे. कोणकोणत्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे, हे चौकशीतून उघड होईल, त्यामुळे त्याच्यावर न्यायालयात खटला चालविणे सोपे होईल. राजनच्या चौकशीतून गॅंगस्टर, पोलीस व राजकारणी यांच्या संबंधावरही प्रकाश पडू शकेल.
‘आयबीला नकोसा झाला’

विशेष प्रतिनिधी, मुंबई
शत्रूचा मित्र तो आपला मित्र, या तत्त्वाने आतापर्यंत हेर म्हणून वावरणारा राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन आता भारतीय गुप्तचर यंत्रणेला नकोसा झाल्याने त्याची टीप देण्यात आली असावी वा छोटा राजनला स्वत:ला भारतात परतायचे असल्यामुळे तो स्वत:हूनच शरण आला असण्याची दाट शक्यता आहे. तब्बल दोन दशके फरारी असलेला छोटा राजन अचानक सापडल्याबद्दल आणि इंटरपोलने प्रसिद्धी दिलेल्या छायाचित्रातील आनंदी छोटा राजन पाहून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.
दाऊदलाही मुंबईत परतायचे होते. परंतु त्याच्या अटी मान्य करण्यासारख्या नव्हत्या, ही बाब केंद्र सरकारच्या पातळीवरच स्पष्ट झाली आहे. भारतीय तपास यंत्रणेने कितीही नाकारले तरी छोटा राजन हा त्यांचा खबऱ्या होत्या आणि दाऊदविरोधी कारवाईमधील मोठा म्होरक्या होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईने भारतीय गुप्तचर यंत्रणेचे बिंग फुटले होते. गुप्तचर यंत्रणेच्या मनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत छोटा राजन ताब्यात येऊ शकत नाही, हे स्पष्ट होते. आता एक तर गुप्तचर यंत्रणेला त्याची गरज उरलेली नाही वा त्यालाच भारतात परतायचे असावे, या दोनच शक्यता असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
गुप्तचर यंत्रणेच्या छुप्या पाठिंब्यामुळे छोटा राजन कधी मलेशियात, कधी बँकॉकमध्ये तर गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया असा वावर ठेवू शकला. मोहन कुमार वा वेगवेगळ्या नावाने पासपोर्ट धारण करणारा छोटा राजन आतापर्यंत कधीच इंटरपोलला आढळून आला नाही आणि आता अचानक तो बालीमध्ये आढळतो, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयात दाखल असलेला छोटा राजन भारतीय तपास यंत्रणेने ताबा घेण्याआधी पळून जातो, हे सारे आश्चर्यकारक होते. किंबहुना त्याच्या पलायनासाठी गुप्तचर यंत्रणेनेच अगदी बोटीचीही व्यवस्था केली होता. राजनच्या सांगण्यावरून विकी मल्होत्रा व फरीद तनाशा हे दाऊदला संपवण्यासाठी गुप्तचर यंत्रणेने आखलेल्या कटाचा भाग होते. दोघे कराचीत पोहोचले, परंतु दाऊदची फौज छेदणे कठीण असल्याने तो डाव नंतर गुंडाळला.
छोटा राजन मिड-डेचे पत्रकार जे डे यांच्या हत्येतही तो प्रमुख आरोपी आहे. दाऊद टोळी हात धुऊन छोटा राजनच्या मागे लागली आहे. मध्यंतरी छोटा शकील टोळीने थेट ऑस्ट्रेलियात जाऊन छोटा राजनला ठार मारण्याचा कट आखला होता. परदेशांत आश्रय घेणे आता छोटा राजनला धोकादायक वाटू लागले असावे.